भुवनेश्वर : हॉकी इंडिया (एचआय)ने या महिन्यात १८ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या अर्जेंटिना दौऱ्यासाठी सीनियर महिला संघाची घोषणा केली आहे. त्यात रितू राणी ही कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.एचआयने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान रितू राणीच्या नेतृत्वाखालील १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. गोलपोस्टची निगराणी सविता आणि रजनी एतिमापू करील तर उपकर्णधार दीपिका, दीप ग्रेस एक्का या बचाव फळी मजबूत करतील. मिडफिल्डची जबाबदारी रितू आणि लिलिमा मिंज यांच्यावर असेल. आक्रमणाची मदार नवनीत कौर व वंदना कटारिया यांच्या खांद्यावर असेल.भारतीय हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक नील अँड्र्यू हॉगूड यांनी म्हटले की, ‘जेव्हापासून कॅम्प सुरू झाला तेव्हा पूर्ण संघ एकजूट होऊन सराव करीत आहे. आम्ही एकजुटीवर अधिक भर देत आहोत आणि संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ प्रत्येक खेळाडूची क्षमता वाढविण्यावर मेहनत घेत आहे. संघात अनुभवी कर्णधार आहे. अर्जेंटिनात रियोसारखी परिस्थिती मिळेल. ज्यामुळे आमची आॅलिम्पिकच्या तयारीला मजबुती मिळेल. माझा संघावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही स्पर्धेत निश्चितच चांगली कामगिरी करू.’
अर्जेंटिना दौऱ्यासाठी महिला हॉकी संघ जाहीर
By admin | Updated: November 8, 2015 01:47 IST