नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील महिन्यात श्रीलंकेत आयोजित संभाव्य मालिकेसाठी यापूर्वीच त्यांच्या सरकारचा हिरवा कंदील मिळालेला आहे, तर भारताला अद्याप सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शुक्ला म्हणाले, ‘आम्ही यापूर्वीच मालिकेबाबत मंत्रालयाकडे अर्ज सादर केलेला आहे, पण विदेश मंत्री सुषमा स्वराज राष्ट्रकुल संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी माल्टा येथे गेल्या असल्यामुळे त्या परतण्याची प्रतीक्षा करीत आहोत. स्वराज मायदेशी परतल्यानंतर याबाबत निर्णय होईल.’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आयोजित संभाव्य मालिकेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला आहे. ही मालिका १५ डिसेंबर ते जानेवारीचा पहिला आठवडा या संभाव्य कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. या मालिकेत तीन वन-डे आणि दोन टी-२० सामने होण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान २००७ पासून कसोटी क्रिकेट खेळले गेलेले नाही. पाकिस्तानने २०१२-१३ मध्ये मर्यादित षटकांच्या छोटेखानी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)दोन बोर्डांनी (बीसीसीआय व पीसीबी) यापूर्वीच मालिकेबाबत निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. खेळाची राजकारणासोबत सरमिसळ करू नये. सरकारच्या सहमतीशिवाय आम्ही पाकिस्तानसोबतच्या मालिकेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे अर्ज सादर केलेला असून शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सरकारकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत माहिती कळवू. - राजीव शुक्ला
आम्हाला सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा - शुक्ला
By admin | Updated: November 29, 2015 01:32 IST