ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.18- ‘बंगळुरुमध्ये झालेल्या महिनाभराच्या सराव शिबिरातून संघाची चांगली तयारी झाली आहे. या शिबिरात संघातील सर्व १८ खेळाडूंनी कठोर मेहनत घेतली. एकूणंच आगामी अझलन शाह चषक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत,’ असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
मलेशिया येथे २९ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघ एक महिन्यापासून बंगळुरु येथे सराव करीत होता. यानिमित्ताने भारताचा कर्णधार श्रीजेश याने ‘लोकमत’शी संवाद साधला. श्रीजेशने म्हटले की, ‘यावर्षी दोन आणि पुढील वर्षी दोन अशी एकूण चार मुख्य स्पर्धा आम्हाला खेळायचे आहेत. त्यादृष्टीने संघाची तयारी सुरु असून हा खडतर सराव शिबिर होता. प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. विशेष करुन ज्युनिअर खेळाडूंनी अधिक शिकण्याचा प्रयत्न केला. अझलन शाह स्पर्धेतून आम्ही अनेक नवे प्रयोग करणार आहोत. याचा भविष्यात संघाला नक्कीच खूप फायदा होईल.’
त्याचप्रमाणे, ‘आगामी प्रत्येक स्पर्धेत आम्हाला पोडियम गाठायचे आहे आणि हेच भारतीय हॉकी संघाचे मुख्य लक्ष्य आहे. त्याचबरोबर कामगिरीत सातत्य कायम राखायचे आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे अप्रतिम मिश्रण ही आमची ताकद असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे,’ असेही श्रीजेशने सांगितले.
श्रीजेशने पुढे सांगितले की, ‘कर्णधार म्हणून माझ्यासाठी संघातील सर्व १८ खेळाडू समान आहेत. तसेच, संघातील इतर खेळाडूंवर ज्या जबाबदारी आहेत त्याच जबाबदारी माझ्यावरही आहेत. संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही. त्यामुळे संघातील सर्व खेळाडू आमच्यासाठी प्रमुख खेळाडू आहेत.’ गेल्या काही स्पर्धांवर नजर टाकल्यास भारतीय संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. याबाबत श्रीजेश म्हणाला की, ‘कठोर मेहनत हेच भारतीय हॉकीच्या यशाचे हेच एकमेव कारण आहे. खेळाडूंची झोकून देण्याची वृत्ती, प्रशिक्षकांचे जबरदस्त मार्गदर्शन तसेच सराव शिबिरातील योजनांचा प्रत्यक्ष सामन्यात यशस्वीपणे अवलंब करणे यामुळे आम्ही चमकदार कामगिरी करु शकलो.’
अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याचे सांगताना श्रीजेश म्हणाला की, ‘अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वांनाच स्पर्धेला सामोरे जावे लागेल. त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. विशेष म्हणजे सध्या यासाठी एक मैत्रिपूर्ण स्पर्धा सुरु असून यामुळे संघाची कामगिरी उंचावण्यात खूप मदत होत आहे.’
अझलन शाह स्पर्धेत कोणत्याही संघाला गृहित धरु शकणार नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये कॅनडाविरुद्ध आमचा कसा खेळ झाला हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच प्रत्येक प्रतिस्पर्धी आमच्यासाठी कडवाच असेल. प्रत्येक सामन्यातून विजयी गुण मिळवण्याचा आमचा प्रत्यत्न असेल. - पी. आर. श्रीजेश