ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - विराट कोहलीने अल्पावधीतच आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. पण पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे. ती उणीव म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना डीआरएसचा पुरेपूर फायदा उठवण्यात संघाला येत असलेले अपयश.
गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासूम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. भारताने डीआरएसचा स्वीकार केल्यापासून फलंदाजीदरम्यान, 13 वेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली. त्यापैकी केवळ चार वेळा पंचांचा निर्णय बदलण्यात भारताला यश मिळाले. तर गोलंदाजीदरम्यान भारताने 42 वेळा मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, पण त्यातील केवळ दहा वेळाच भारताचे अपील यशस्वी ठरले.
बराच काळ डीआरएसपासून दूर राहिलेल्या भारतीय संघामध्ये या प्रणालीबाबत अननुभवीपणा प्रकर्षाने जाणवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुणे कसोटीतही भारतीय संघाने क्षेत्ररक्षण करताना चार वेळा डीआरएस वापरला, पण चारही वेळा भारताच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताने तीन वेळी डीआरएसच वापर केला, पण त्यातील केवळ एक वेळच भारताला यश मिळाले.