दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारा (आयसीसी) यंदाच्या आयसीसी पुरस्कारासाठी विराट कोहली या एकमेव भारतीय खेळाडूला वनडेमधील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूच्या यादीत नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूच्या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला वन डे आणि टी-२० या दोन प्रकारांसाठी नामांकन मिळाले हे विशेष.मितालीला सर्वोत्कृष्ट वन डे आणि टी-२० क्रिकेटपटूच्या संभाव्य यादीत स्थान मिळाले. या चढाओढीत सात खेळाडू आहेत. दोन्ही प्रकारांत ज्या सात खेळाडूंना स्थान मिळाले त्यात मिताली राज, मिशेल जॉन्सन, डिव्हिलियर्स, चार्लोट एडवडर््स, अँजेलो मॅथ्यूज, कुमार संगकारा आणि स्टीफनी टेलर यांचा समावेश आहे. दरम्यान आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन आणि लंकेचा कुमार संगकारा हे दुसऱ्यांदा सर्वश्रेष्ठ खेळाडूंसाठी असलेली सर गॅरी सोबर्स ट्रॉफी जिंकण्याच्या चढाओढीत आहेत. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला आयसीसी पुरस्कार एका खेळाडूने दुसऱ्यांदा जिंकल्याची नोंद नाही.इंग्लंडचे गॅरी बॅलेन्स आणि बेन स्टोक्स, न्यूझीलंडचे कोरी अॅण्डरसन आणि जिम्मी निशाम यांना सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडूंसाठी नामांकन लाभले. या पुरस्कारासाठी २६ आॅगस्ट २०१३ रोजी खेळाडूचे वय किमान २६ वर्षे असावे, तसेच तो किमान पाच कसोटी आणि दहा वन डे खेळलेला असावा, अशी अट आहे. २६ आॅगस्ट २०१३ ते १७ सप्टेंबर २०१४ या १३ महिन्यांच्या कामगिरीचा विचार पुरस्कारासाठी केला जाईल. यंदा ११ वैयक्तिक पुरस्कार दिले जातील. शिवाय, आयसीसीचे सर्वोत्कृष्ट कसोटी आणि वन-डे संघ निवडले जातील. वैयक्तिक पुरस्कारांसाठी जगातील नामवंत क्रिकेटतज्ज्ञांनी निवड केली. यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा प्रमुख अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या पाच सदस्यांनी नामांकन निश्चित केले. विजेत्यांच्या नावाची घोषणा १४ नोव्हेंबर रोजी होईल, तर विशेष टीव्ही शो चे आयोजन १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. (वृत्तसंस्था)
वनडे सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंसाठी विराट कोहलीला नामांकन
By admin | Updated: November 6, 2014 01:10 IST