नवी दिल्ली : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट गटात शनिवारी आॅस्ट्रेलियाच्या केरी होपच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे. त्यागराज स्टेडियममध्ये रंगणार ही लढत बघण्यासाठी महान खेळाडू, राजकीय पुढारी आणि बॉलिवूड स्टार उपस्थित राहणार असून चाहत्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंतच्या सहाही लढतीत विजय मिळवला आहे. विजेंदरला यावेळी सर्वात अनुभव व दिग्गज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढावे लागणार आहे. होप यापूर्वी डब्ल्यूबीसी युरोपियन चॅम्पियन होता. त्याचे जय-पराजयाची कामगिरी २३-७ अशी आहे. विजेंदरने अधिकृतपणे वजन चाचणी केल्यानंतर सांगितले की, ‘मी शनिवारपर्यंत लढतीची प्रतीक्षा करू शकत नाही. मी सहा वर्षांनंतर दिल्लीमध्ये रिंगमध्ये उतरणार आहे. यापूर्वी मी येथे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालो होतो. येथे खेळण्यास उत्सुक आहे.’ आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना विजेंदरपुढे आव्हान निर्माण करता आले नाही, पण होप दिग्गज प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
होपविरुद्ध यशाचा विजेंदरला विश्वास
By admin | Updated: July 16, 2016 02:33 IST