ऑनलाइन लोकमतरिओ दी जेनेरिओ, दि. 8- नेमबाज अभिनव बिंद्राचं 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात कांस्यपदक थोडक्यासाठी हुकलं. अभिनवला अंतिम फेरीत चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. पात्र फेरीमध्ये सातवे स्थान पटकावत अभिनवनं अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत त्याला पदक पटकावता आलं नाही.
ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन दिवसांमध्ये भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशाच पडली होती. भारताला अभिनव बिंद्राकडून पदकाची मोठी आशा असताना त्यानं भारताच्या आनंदावर विरजण घातलं आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतानं एकही पदक पटकावलं नाही. मात्र अभिनव बिंद्रामुळे भारताच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.अगदी शेवटच्या क्षणी अभिनव चौथ्या स्थानावर फेकला गेला आणि त्याचं पदक अगदी थोडक्यात हुकलं.
तत्पूर्वी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनव बिंद्रा 625.7 गुणांची कमाई 7व्या स्थानी झेप घेतली होती. तर 621.7 गुण मिळवलेला गगन नारंग स्पर्धेबाहेर गेल्यानं तो 23व्या स्थानावर फेकला गेला. अभिनव बिंद्रानं 6 फेरीत 625.7 गुणांची कमाई केली. प्रत्येक फेरीत 10 शॉट लावणे गरजेचं होते. अभिनवनं पहिल्या फेरीमध्ये 104.3 अशी गुणांची कमाई केली होती. त्यानंतर दुस-या फेरीमध्ये त्यानं चांगली खेळी करत 104.4 असे गुण मिळवले होते. तिस-या फेरीत अभिनवनं 105.9 असे सर्वाधिक गुण मिळवले. मात्र त्यानंतरच्या दोन फे-यांमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. अभिनवनं चौथ्या आणि पाचव्या फेरीत प्रत्येकी 103.8 आणि 102.1 असे गुण मिळवले. अखेरच्या फेरीत बिंद्रानं उत्कृष्ट खेळाच्या जोरावर 105.2 गुणांपर्यंत मजल मारली आणि तो सातव्या स्थानी राहून अंतिम फेरीत पोहोचला असतानाही त्याच्या पदरी निराशा आली आहे.