विदर्भ- दिल्ली रणजी सामना
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
रणजी सामना : यजमान गोलंदाजांचा भेदक मारा ; दिल्ली ८ बाद १३३, श्रीकांत वाघचे ४ बळी
विदर्भ- दिल्ली रणजी सामना
रणजी सामना : यजमान गोलंदाजांचा भेदक मारा ; दिल्ली ८ बाद १३३, श्रीकांत वाघचे ४ बळीविदर्भापुढे दिल्लीची घसरगुंडी नागपूर : दिग्गज फलंदाजांची कोंडी करीत विदर्भाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे ब गटातील रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिल्ली संघाची ८ बाद १३३ अशी दाणादाण उडाली. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये हा सामना खेळविला जात आहे. विदर्भाच्या पहिल्या डावातील ३७० धावांना उत्तर देणाऱ्या पाहुण्या संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी अद्याप ८७ धावांची गरज असून दोन गडी शिल्लक आहेत. वीरेंद्र सेहवाग हा तापाने फणफणत होता. संघाची पडझड झाल्यामुळे बरे वाटत नसताना देखील तो नवव्या स्थानावर फलंदाजीला आला. तो सहा धावांवर तर वरुण सूद २१ धावांवर खेळत होते. विदर्भाचा डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघ याच्या माऱ्यापुढे फलंदाजांनी नांगी टाकताच दिल्लीचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत गेले. वाघला राकेश धृव आणि अक्षय वखरे यांच्या फिरकीची साथ लाभली. गौतम गंभीर याला धृवच्या चेंडूवर यष्टिरक्षक उर्वेश पटेल याने बाद केले त्यावेळी दिल्लीच्या १३ धावा फळ्यावर होत्या. वखरेने शिवम शर्मा याला भोपळाही न फोडू देता तंबूची वाट दाखवली. उन्मुक्त चंद २१ आणि अनुभवी मिथून मन्हास २७ यांनी पडझड थोपविण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण वाघच्या चेंडूवर मन्हास बाद झाल्यानंतर उन्मुक्तही फार काळ स्थिरावू शकला नाही. मिलिंद कुमार हा वाघचा चौथा बळी ठरल्याने दिल्लीचा अर्धा संघ ७१ धावांत बाद झाला होता. चहापानाच्यावेळी त्यांची स्थिती ७ बाद ८५ धावा अशी केविलवाणी होती.विदर्भाकडून वाघने ३३ धावांत चार, धृवने २६ धावांत ३ आणि वखरेने एक गडी बाद केला.त्याआधी विदर्भाने कालच्या २७४ वरुन पुढे खेळताना नाबाद शतकवीर गणेश सतीश याच्या १४ चौकारांसह काढलेल्या १६३ धावांमुळे ३७० पर्यंत मजल गाठली. उर्वेश पटेल २५, श्रीकांत वाघ २४ यांनीही बऱ्यापैकी योगदान दिले. दिल्लीकडून शिवम शर्मा याने ६७ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले. उद्या शनिवारी तिसऱ्या दिवशी दिल्लीवर फॉलोऑन लादण्याचा विदर्भाचा प्रयत्न असेल.(क्रीडा प्रतिनिधी)