नवी दिल्ली : देशभरातील खेळाडूंसाठी आॅनलाईन तक्रार निवारणासाठी केंद्र स्थापन करण्याची कोणतीही योजना नसल्याचे क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केले. क्रीडामंत्र्यांनी याबाबत राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर दिले.सोनोवाल म्हणाले की, केरळमध्ये खेळाडूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर तात्कालिक उपाय करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यात आली. आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाय करण्यात आले. सोनोवाल यांना आॅनलाईन तक्रार निवारण तंत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, देशभरात खेळाडूंसाठी आॅनलाईन तक्रार निवारण तंत्र स्थापन करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. सोनोवाल म्हणाले की, अमेरिकेत जून मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतीय संघाने सहभाग घेतला होता. त्यात ३१ सदस्य होते. त्यातल्या तीन खेळाडूंकडे अमेरिकेचे व्हिसाही होते. उर्वरीत २८ खेळाडूंनी व्हिसासाठी अर्जही केले. त्यातील ९ खेळाडूंना दिल्लीतील दुतावासाने व्हिसा दिले. मात्र उर्वरीत १९ खेळाडूंचे अर्ज नाकारण्यात आले. खेळाडूंनी अर्जात अमेरिकेत जाण्याचे कारण स्पष्ट केले नसल्याचे दुतावासाने सांगितले होते. त्यानंतर मंत्रालयाने अमेरिकी दुतावासाला पुन्हा एक व्हिसा नोट व्हर्बेल पाठवली. तरीही १९ खेळाडूंना व्हिसा देण्यात आला नाही. सोनोवाल यांना टीओपी योजनेबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर क्रीडा मंत्री म्हणाले की, टीओपी योजनेचा मुख्य उद्देश आॅलिम्पिक खेळासाठी विशेषत: रिओ आॅलिम्पिकसाठी संभाव्य विजेत्या खेळाडूंची तयारी करणे. या योजनेत विविध खेळातील १०२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे
आॅनलाईन तक्रार निवारणाची योजना नाही
By admin | Updated: August 5, 2015 23:37 IST