नवी दिल्ली : तंत्रातील उणिवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये यश मिळविण्याचा निर्धार यामुळे २०१४ चा इंग्लंड दौरा माझ्यासाठी निराशाजनक ठरला, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. त्यानंतर मी केवळ मानसिकतेतच बदल केला नाही, तर फलंदाजीमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले.इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनसोबत बीसीसीआय डॉट टीव्हीवर चर्चा करताना कोहलीने तंत्राबाबत चर्चा केली. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विराट एक अर्धशतक झळकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चार शतके झळकावली. यावेळी कोहली म्हणाला, ‘२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात मला अधिक दडपण जाणवत होते. मी तेथे कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा फटकावण्यास उत्सुक होतो. काही विशेष देशांमध्ये धावा फटकावल्या तरच तुम्हाला चांगला खेळाडू मानण्यात येईल, असे निकष उपखंडातील खेळाडूंबाबत लावण्यात येतात. मी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक होतो. चांगली सुरुवात झाली नाही, तर त्याचे दडपण येते.’याबाबत सविस्तरपणे बोलताना कोहली म्हणाला, ‘तंत्र महत्त्वाचे आहे; पण ज्यांचे तंत्र चांगले नसते, ते खेळाडूही सकारात्मक मानसिकतेच्या आधारावर तेथे धावा फटकावण्यात यशस्वी ठरतात. मला कुठली अडचण नव्हती. मी इनस्विंग गोलंदाजीची आशा बाळगत होतो. त्यामुळे मी स्वत:चा ‘स्टान्स’ बदलला होता. मी सतत इनस्विंगचा विचार करीत असल्यामुळे आऊटस्विंग खेळण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यानंतर मी माझ्या तंत्रात बदल केला.’ (वृत्तसंस्था)>‘जीवनात जास्त लोक असल्याने लक्ष विचलित’भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या अफाट यशाचे रहस्य त्याच्या जीवनात ‘जास्त जवळचे लोक नसणे’ हे सांगितले. जास्त लोक असल्याने अडथळा निर्माण होतो असे त्याचे म्हणणे आहे.कोहली म्हणाला, ‘‘मी नशीबावान आहे. कारण माझ्या जीवनात असे लोक नाहीत, की ज्यांच्या मी जास्त जवळ आहे. मला त्यामुळे मदत मिळते. जर तुमच्या जीवनात जास्त लोक असल्यास तुम्ही खूप मित्रांशी चर्चा करतात आणि तुमचे लक्ष विचलित होते आणि तुमच्या वेळेचे नियोजनही बिघडते.’’
२०१४च्या इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रात सुधारणा : कोहली
By admin | Published: January 17, 2017 7:41 AM