अहमदाबाद : शानदार विजयासह मालिकेत शानदार सुरुवात केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ उद्या येथे होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर आपले वर्चस्व राखण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवेल.पहिल्या वनडेत १६९ धावांनी विजय मिळवल्यानंतर मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमवरदेखील भारतीय संघाचे पारडे जड राहील. याआधी भारतीय संघाने दिल्ली आणि धर्मशाळेत वेस्ट इंडीजवर विजय मिळवला होता.मानधनाच्या वादामुळे वेस्ट इंडीज त्यांचा दौरा मध्यातच रद्द केल्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. त्यांना मायदेशी फिटनेस ट्रेनिंग कार्यक्रम सोडून भारतात यावे लागले.पहिल्या वनडेत भारतासाठी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी द्विशतकी (२३१ धावा) भागीदारी केली होती आणि ही भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी भागीदारी ठरली होती. या सामन्यात मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर लाभ घेताना धवनला सूर गवसला होता. या दोघांच्या मजबूत पायाभरणीमुळे भारताने ५ बाद ३६३ धावांचा एव्हरेस्ट रचला होता.त्यामुळे श्रीलंकेला मालिकेत मुसंडी मारण्यासाठी उद्या भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखावे लागेल. लसिथ मलिंगा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथशिवाय श्रीलंकेचे गोलंदाजी आक्रमण कमजोर दिसत आहे.श्रीलंकन फलंदाजीच्या फळीत तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेसारखे अनुभवी खेळाडू आहेत; परंतु त्यांना सांघिक कामगिरी करावी लागेल.भारतीय फलंदाजांसमोर श्रीलंकन गोलंदाज फारसा करिश्मा करूशकले नाहीत. रहाणे आणि धवन यांनी मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली होती. त्यामुळे फलंदाजीच्या फळीत सुरेश रैना वरच्या क्रमांकावर असेल आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली असेल. त्यामुळे भारताची आघाडीची फळी मजबूत दिसत आहे. धवन वनडे क्रिकेटमध्ये २000 धावा पूर्ण करण्यापासून १२४ धावांनी दूर आहे. (वृत्तसंस्था)