मुंबई : एचएस फोर (हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्था) बॉडीबिल्डिंग लीगच्या पहिल्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाच्या सुजान पिळणकरने बाजी मारली. त्याने सव्वाशे खेळाडूंच्या उपस्थितीत रंगलेल्या या लीगमध्ये गिरगावकरांची मने जिंकत पाच स्पर्धाच्या मालिकेत आघाडी घेतली.
मुंबईत वजनीगटाच्या शरीरसौष्ठव संघटनांचे आणि खेळाडूंचे प्राबल्य असताना सर्वात जुन्या परंतु उपेक्षित राहिलेल्या हौशी शरीरसौष्ठव संघटनेने या खेळातही लीग आयोजित करण्याचे धाडस दाखवले. दोन महिने चालणा:या पाच स्पर्धाच्या या लीगचा गिरगावमध्ये पार पडलेला पहिला टप्पा यशस्वी झाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़गृहात या लीगसाठी तब्बल सव्वाशे खेळाडूंनी उपस्थिती लावली.
चार गटांत झालेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक गटात 25 ते 30 खेळाडूंची चुरस पाहून संघटकांची चांगलीच दमछाक झाली. चार गटांपैकी तिसरा गट टॉल ग्रुप आणि चौथा सुपर टॉल ग्रुपमध्ये अव्वल स्थान संपादण्यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. टॉल ग्रुपमध्ये अंकुश तेरवणकरने बाजी मारली तर सुपर टॉलमध्ये सुजान पिळणकरने सर्वावर मात करीत पहिला क्रमांक पटकावला. मग जेतेपदासाठी झालेल्या लढतीतही मनोहर पाटील, अंकुश तेरवणकर आणि सुजान पिळणकरमध्ये काँटे की टक्कर झाली. तिघेही तोडीस तोड होते, पण सर्वात उंच असलेला सुजानच सरस ठरला आणि त्याने गटविजेतेपदाचे 8 आणि जेतेपदाचे 3 असे सर्वाधिक 11 गुण कमावले. शॉर्ट ग्रुपमध्ये अव्वल आलेल्या सतीश मालुसरेने बेस्ट पोझरच्या स्पर्धेत दोन गुणांची कमाई करीत एकूण 10 गुण संपादले. पहिल्या टप्प्याअखेर तो दुसरा असून, बेस्ट पोझर विनायक घडसे तिस:या क्रमांकावर आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
चेतन, प्रकाश यांना जेतेपद : श्री मावळी मंडळातर्फे नुकत्याच पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘श्री मावळी मंडळ श्री’चा मान चेतन शिंदे याने तर जिल्हास्तरीय ‘श्री मावळी मंडळ श्री’चा मान प्रकाश मोरे याने पटकावला. ठाण्यात रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 1क्क् स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्फूर्ती व्यायामशाळेचा रूपेश चव्हाण ‘सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक’ ठरला.