रायपूर : सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरलेल्या हैदराबाद सनरायजर्सला आयपीएल-८ मध्ये शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय नोंदविणे क्रमप्राप्त ठरेल.सनरायजर्सने काल मुंबई येथे राजस्थानवर ७ धावांनी विजय नोंदवत प्ले आॅफच्या आशा उंचावल्या होत्या. हा संघ पाचव्या स्थानावर आहे. मागील शनिवारी हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्सला २२ धावांनी नमवून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत तर दिले पण लगेच सोमवारी केकेआरकडून पराभव पत्करला होता. राजस्थानविरुद्धच्या विजयात हैदराबादकडून शिखर धवन ५४ आणि इयोन मोर्गनने २८ चेंडूत ६८ धावांचे योगदान दिले. डेव्हिड वॉर्नर २४ आणि मोझेस हेन्रिक्स २० यांनीही चांगली सुरूवात केली पण मोठी खेळी करण्यात दोघेही अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा आणि प्रवीण कुमार हे चांगले गोलंदाज संघात आहेत. दुसरीकडे दिल्लीला या सत्रात ७व्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. जेपी डुमिनीच्या नेतृत्वाखालील हा संघ प्ले आॅफच्या चढाओढीतून जवळपास बाद झाला. युवराज सिंग, अँजेलो मॅथ्यूज आणि झहीर खान यांच्यासारखे दिग्गज संघाला सावरण्यात अपयशी ठरले. डेअर डेव्हिल्सने ११ सामन्यांत ८ गुण मिळविले आहेत. हा संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)
सनरायजर्सला विजय आवश्यक
By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST