धर्मशाला : कसोटी सामना खेळविण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिल्यानंतर हिमाचल प्रदेश येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धर्मशाला स्टेडियममध्ये आता कसोटी सामना खेळविण्यात येईल. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे (एचपीसीए) प्रसारमाध्यम सचिव मोहित सूद यांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे सांगितले, की आयसीसीकडून धर्मशाला येथे कसोटी सामना खेळविण्याची परवानगी मिळाली आहे. एचपीसीएचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) सचिव अनुराग ठाकूर धर्मशाळा येथे कसोटी सामने आयोजित करण्यासाठी आयसीसीबरोबर सातत्याने चर्चा करीत होते. धर्मशाला स्टेडियमला २०१२ साली आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली होती. राजधानी शिमलापासून २५० किमी अंतरावर असलेल्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २१ हजार ६०० इतकी आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे नऊ सामने खेळविण्यात आले असून हे भारतातील पहिले असे स्टेडियम आहे; जेथे थंड वातावरणास अनुकूल ठरतील, असे गवत निर्माण करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
धर्मशाला स्टेडियमला मिळाली कसोटी आयोजनाची परवानगी
By admin | Updated: November 10, 2015 23:14 IST