मोहाली : पीसीएच्या मंद खेळपट्टीवर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी फलंदाजांची भंंबेरी उडाल्याने भारताच्या २०१ धावांच्या प्रत्युत्तरात द. आफ्रिकेचा डाव १८४ धावांत आटोपला. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन याने अर्धा संघ गारद केल्याने भारताला १७ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ६३ धावांमुळे दोन बाद १२५ पर्यंत मजल गाठून एकूण १४२ धावांच्या आघाडीसह भारताने सामन्यावर पकड घट्ट केली आहे.भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात आक्रमक केली. मुरली विजयने पहिल्याच षटकांत व्हर्नोन फिलॅन्डरला दोन सणसणीत चौकार ठोकले. पण चहापानाच्या आधी शिखर धवन स्लिपमध्ये डिव्हिलियर्सला झेल देत बाद झाला. धवन दोन्ही डावांत भोपळा न फोडताच परतला हे विशेष. आफ्रिकेला दुसरे यश इम्रान ताहिरने मिळवून दिले. पहिल्या डावात ७५ धावा काढणारा विजय ताहिरच्या गुगलीला बळी पडला. शॉर्टलेगवर बुवामाने त्याचा सुरेख झेल टिपला. दरम्यान पुजाराने एल्गरला मिडआॅनवर चौकार ठोकून ९३ चेंडूत सहा चौकारांसह अर्धशतक गाठले. तो ६३ धावांवर आणि कर्णधार विराट कोहली ११ धावांवर नाबाद आहे.त्याआधी डिव्हिलियर्सच्या ८३ चेंडूतील ६३ धावांच्या बळावर द. आफ्रिकेने १८४ पर्यंत मजल गाठली. अश्विनने आजच कसोटी क्रिकेटमध्ये १३ व्यांदा पाच गडी बाद करण्याची किमया साधली. त्याचे २९ सामन्यात १५० बळी झाले आहेत. त्याने वान झिल ५, डीन एल्गर ३७, हाशिम अमला ४३ डेन विलास १ आणि इम्रान ताहिर यांना बाद केले. रवींद्र जडेजाने तीन आणि मिश्राने दोन गडी बाद केले. उपहारापर्यंत पाहुण्यांनी ५ बाद १२७ धावा केल्या होत्या. जडेजाने फिलॅन्डरला(३)टिपले तर मिश्राने सिमोन हार्मरला (७) याला पायचित केले. स्टेनला मिश्राची गुगली न समजल्यामुळे तो यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकडून यष्टिचित झाला. ६४ व्या षटकांत मिश्राने डिव्हिलियर्सला बाद करताच आफ्रिकेची आशा मावळली. अमला अश्विनच्या पुढच्या षटकात बाद झाला. कालच्या २ बाद २९ वरून सकाळी अमला- एल्गर जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. अश्विनने विलासला बाद करीत आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था) सर्वांत जलद १५० बळीआॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाच गडी बाद करीत भारताकडून सर्वांत जलद १५० गडी बाद करण्याचा विक्रम नोंदविला. २९ व्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली. याशिवाय डावाची सुरुवात करीत ५० गडी बाद करणारा शतकातील पहिला फिरकी गोलंदाज देखील ठरला आहे. या सामन्याआधी कसोटीत प्रारंभी गोलंदाजी सुरू करीत अश्विनने ४५ बळी पूर्ण केले होते. ज्येष्ठ क्रिकेट आकडेतज्ज्ञ आर. गोपालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनच्या पुढे इंग्लंडचा कोलिन ब्लीथ आहे. त्याने १९०२ ते १९१० या कालावधीत १३ कसोटी सामन्यात १३१९ धावा देत ७४ गडी बाद केले होते.याशिवाय आॅस्ट्रेलियाचा ह्यूज ट्रम्बल, इंग्लंडचा आर. पील, आॅस्ट्रेलियाचा जॉय पाल्मर आणि इंग्लंडचा विल्फ्रेक ऱ्होड्स यांनी अशी कामगिरी केली आहे. अश्विनने १२ सामन्यात १८८८ चेंडूत १०१८ धावा देत ही कामगिरी बजावली. ...आणि आश्विन भडकलापहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व दिल्याबद्दल आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन मीडियावर चांगलाच उखडला. खेळपट्टी खराब असल्याचे वृत्त खोडसाळ असून अनेक फलंदाज खराब फटके खेळून बाद झाल्याचे आश्विनचे मत आहे.भारत पहिल्या डावात २०१ धावांत बाद झाल्यानंतर आश्विनने ५१ धावांत पाच गडी बाद करीत संघाला १७ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आश्विन म्हणाला,‘ विकेट खराब आहे किंवा चांगली हे फलंदाजांना ठाऊक असते. जोहान्सबर्ग, पोर्ट एलिझाबेथ यासारख्या ठिकाणच्या क्यूरटेरची नावे भारतीय पत्रकारांना माहीत नसावीत. पण येथे दलजितसिंगला बळीचा बकरा बनविणे सुरू आहे. द. आफ्रिकेत जाऊन विकेट हिरवीगार आहे असे कुणी म्हणेल काय? अशा प्रकारच्या गोष्टी विदेशात होत नाहीत. मी देखील विदेशात कधी असे ऐकले नाही, पण येथे सामना सुरू होण्याच्या आधीपासूनच विकेट थोडी टणक असल्याचे बोलले जात होते. आम्ही दीर्घकाळापासून मोहालीत खेळत आल्याने येथे खेळपट्टी कसे स्वरूप बदलते याची जाणीव आहेच.’या खेळपट्टीवर गोलंदाजीबाबत विचारले असता आश्विनने सांगितले की या खेळपट्टीवर थोडे वेगवान चेंडू टाकणे आवश्यक आहे. विजयचा अपवाद वगळता कुणीही फलंदाज बचावात्मक फटका मारताना बाद झालेला मी पाहिला नाही. फटका मारताना फुटवर्कचा वापर आवश्यक आहे. डिव्हिलियर्स विरुद्धच्या डावपेचांबाबत विचारताच आश्विन म्हणाला,‘ टी-२० आणि वन डेत त्याला वेगळी दिशा, टप्पा आणि वेग राखून चेंडू टाकले. येथे त्याला दोन- तीन ओव्हर टाकले तेव्हा तो देखील अलगद बाद होऊ शकतो याची खात्री पटली. मी त्याला बाद करू शकलो असतो तर आनंद द्विगुणित झाला असता.डावात माझ्या सहकाऱ्यांच्या काही शॉटमुळे हैराण झालो. एकीकडे हशिम अमलाला टाकलेले चेंडू अप्रतिम होते. एल्गरची फलंदाजी मी यू ट्यूबवर पाहिली. जोहान्सबर्ग येथे अशा प्रकारचे अनेक फटके त्याने मारले आहेत. तो आता जोहान्सबर्गमध्ये नाही, हे मी सांगू इच्छितो. अशा प्रकारचा फटका मारताना मी त्याला जाळ्यात अडकवू शकतो हे मी ओळखले होते.- आऱ आश्विनधावफलकभारत पहिला डाव : सर्वबाद २०१, द. आफ्रिका पहिला डाव डीन एल्गर झे. जडेजा गो. अश्विन १३, वान झिल पायचित गो. अश्विन १, हाशिम आमला यष्टिचित गो. आश्विन ४३, ए बी डिव्हिलीयर्स त्रि. गो. मिश्रा ६३, व्हर्नोन फिलॅन्डर झे. रहाणे गो. जडेजा ३, सिमोन हार्मर पायचित गो. मिश्रा ७, कासियो रबाडा नाबाद १, इम्रान ताहिर झे. पुजारा गो. अश्विन ४, अवांतर १४, एकूण ६८ षटकांत सर्वबाद १८४ धावा. गडी बाद क्रम :१/९, २/९, ३/८५, ४/१०५, ५/१०७, ६/१३६, ७/१७०, ८/१७९, ९/१७९, १०/१८४. गोलंदाजी : अश्विन २४-५-५१-५, उमेश यादव ६-१-१२-०, अॅरोन ८-१-१८-०, जडेजा १८-०-५५-३, मिश्रा १२-३-३५-२.भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. बावुमा गो. ताहिर ४७, शिखर धवन झे. डिव्हिलियर्स गो. फिलॅन्डर ००, चेतेश्वर पुजारा नाबाद ६३, विराट कोहली नाबाद ११, अवांतर : ४, एकूण : ४० षटकांत २ बाद १२५ धावा. गडी बाद क्रम :१/९, २/९५. गोलंदाजी : फिलॅन्डर ७-०-१७-१, हार्मर १०-३-२८-०, एल्गर ७-१-३४-०, ताहिर ८-०-३३-१, रबाडा ८-५-९-०.
फिरले फिरकीचे भुईचक्र
By admin | Updated: November 7, 2015 03:22 IST