कॅनबेरा : ‘जायंट किलर’ आयर्लंड संघाला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सला कसे रोखायचे? असा प्रश्न आयर्लंडच्या गोलंदाजांना भेडसावत आहे. दिग्गज संघांनाही याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डिव्हिलियर्सला रोखण्याची रणनीती सपशेल अपयशी ठरली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात डिव्हिलियर्स वाक बगार आहे. याचा अनुभव वेस्ट इंडीजविरुद्ध यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान आला. विंडीजविरुद्धच्या लढतीत प्रकृती ठणठणीत नसताना त्याने ६६ चेंडूंना सामोरे जाऊन १७ चौकार व ८ षटकारांच्या साह्याने १६२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकने त्या सामन्यात २५७ धावांनी विजय मिळविला. डिव्हिलियर्सने आयर्लंडविरुद्ध जानेवारी महिन्यात केवळ ३१ चेंडूंमध्ये वन-डे क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाची नोंद केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने डिव्हिलियर्सची प्रशंसा करताना एबी पृथ्वीवरील सर्वांत मौल्यवान क्रिकेटपटू असल्याचा उल्लेख केला होता. आठवड्यापूर्वी भारताविरुद्ध १३० धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला डिव्हिलियर्सकडून पुन्हा एकदा अशाच खेळीची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता वेस्ट इंडीजचा माजी प्रशिक्षक फिल सिमन्सच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या आयर्लंड संघाने पहिले दोन सामने जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आयर्लंडने विंडीजविरुद्ध ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २५ चेंडू व ४ विकेट शिल्लक राखून विजय मिळविला. पॉल स्टर्लिंग, एड जॉयस व नील ओब्रायन यांनी त्या सामन्यात वैयक्तिक अर्धशतके झळकाविली होती. त्यानंतरच्या सामन्यात आयर्लंडने संयुक्त अरब अमिरातीचा ९ गडी राखून पराभव केला. आयर्लंडला नशिबाची साथ लाभली, तर उर्वरित चार पैकी एक सामना जिंकून त्यांना बाद फेरी गाठता येईल. उभय संघांची यापूर्वीची कामगिरी लक्षात घेता, मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाचे पारडे वरचढ आहे. आयर्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. २०११च्या विश्वकप स्पर्धेत कोलकाता येथे उभय संघांदरम्यान अखेरची लढत झाली होती. त्यात दक्षिण आफ्रिकेने १३१ धावांनी बाजी मारली होती. स्टेनचा फॉर्म दक्षिण आफ्रिका संघासाठी चिंतेचा विषय आहे. फॉर्मात असलेला फिरकीपटू इम्रान ताहीरने अतापर्यंत ९ विकेट घेतल्या आहेत. (वृत्तसंस्था) हेड टू हेडदक्षिण आफ्रिका व आयर्लंड यांच्यामध्ये ३ एकदिवसीय लढती झाल्या आहेत. या ३ लढती द. आफ्रिकेने जिंकल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेतसुद्धा यांच्यामध्ये २ सामने झाले असून दोन्ही सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली आहे.दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन.आयर्लंड : विलियम पोर्टेरफिल्ड (कर्णधार), अँडी बाल्ब्रीनी, पीटर चॅसे, अॅलेक्स कुसाक्स, जॉर्ज डॉक्रेल, एड जॉयसे, अँडी मॅकब्रीन, जॉन मूनी, केवीन ओब्राइन, नेल ओब्राइन (यष्टीरक्षक), मॅक्स सोरेन्सेन, पॉल स्टीर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन (यष्टीरक्षक), क्रेग यंग