काऊलून : सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करणारी भारताची आघाडीची महिला शटलर पी. व्ही. सिंधू आणि पुरुष खेळाडू सहावा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांना ३,५0,000 डॉलर बक्षीस रकमेच्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.भारताची अव्वल बॅडमिंटन तारका आणि जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित एकेरीची खेळाडू सायना नेहवालने दुखापतीमुळे हाँगकाँगमधून माघार घेतल्यानंतर सिंधूकडून खूप अपेक्षा बाळगल्या जात होत्या; परंतु अन्य भारतीय खेळाडूंप्रमाणेच तिनेही खूप निराश केले. सिंधू आणि श्रीकांत यांच्याशिवाय अन्य पुरुष एकेरीचा खेळाडू अजय जयराम व दुहेरीतील तज्ज्ञ जोडी ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीच्या जोडीचेही पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले.जागतिक स्पर्धेत दोन वेळेस कांस्यपदक जिंकणारी सिंधू हिला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने २१-१७, २१-९ असे ३५ मिनिटांत पराभूत केले. मारीनच्या या विजयामुळे दोन्ही खेळाडूंतील विजयाचे रेकॉर्ड आता ४-२ असे झाले आहे. त्याआधी जागतिक क्रमवारीतील पाचव्या मानांकित श्रीकांतवर पहिल्या फेरीत चीनच्या तियान हुवेई याने २१-१६, १५-२१, २४-२२ अशा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. विशेषत: भारतीय खेळाडू चौथ्यांदा हुवेईचे आव्हान मोडीत काढण्यात अपयशी ठरला. एकेरीतील अन्य खेळाडू जयरामदेखील चीनच्या खेळाडूवर मात करू शकला नाही. चीनच्या अव्वल मानांकित चेन लोंग याने जयरामवर २१-१७, २१-१२ अशी ४0 मिनिटांत मात केली व दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. महिला दुहेरीतील तज्ज्ञ जोडी ज्वाला आणि अश्विनी यांनी पुन्हा निराश केले. कोरियाच्या आठव्या मानांकित जुंग क्यूंग इयुन आणि शिन सियुंग चान यांनी भारतीय जोडीवर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला. (वृत्तसंस्था)
सिंधू, श्रीकांत, जयराम, ज्वाला-आश्विनी पराभूत
By admin | Updated: November 19, 2015 04:47 IST