मकाऊ : दोन वेळा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने आज, रविवारी मकाऊ ग्रां प्री. सुवर्णचषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. अंतिम लढतीत तिने कोरियाच्या किम हिओ मिनचा पराभव करून यंदाच्या सत्रातील पहिलेच जेतेपद आपल्या नावावर केले.सायना नेहवाल स्पर्धेतून बाद झाल्यानंतर सिंधूवरच सर्वांच्या नजरा होत्या. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या सिंधूने येथील सिक मल्टिस्पोर्टस् पॅव्हेलियनमध्ये खेळविण्यात आलेल्या अंतिम लढतीत ४५ मिनिटांत किमचे आव्हान २१-१२, २१-१७ असे परतविले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकणाऱ्या सिंधूला किमकडून कडवे आव्हान मिळाले. किमने उपांत्य फेरीत सातव्या मानांकित चीनच्या यु सून हिचा पराभव करून धक्कादायक निकालाची नोंद केली होती. मात्र, भारतीय अनुभवी खेळाडूने किमचे आव्हान परतवत जेतेपद कायम राखले. किमने आक्रमक खेळाने सुरुवात करून ३-० अशी सहज आघाडी घेतली. या पिछाडीमुळे डगमगून न जाता सिंधूने हळूहळू खेळाला आकार दिला आणि गेम ६-६ असा बरोबरीत आणला. किमने बॅक हॅण्ड रिटर्न लगावून सिंधूसमोरील अडचणी वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय खेळाडूकडून तिला सडेतोड उत्तर मिळाले. सिंधूने ११-८ अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला होता. हा झंझावात कायम राखत सिंधूने जबरदस्त खेळ करून २० मिनिटांत पहिला गेम २१-१२ असा जिंकला. पहिला गेम गमावल्यानंतर किमने दुसऱ्या गेममध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंधूच्या निर्धारासमोर तिला तग धरण्यात अपयश आले. ७-७, ११-८, १३-११ व १३-१३ असा अटीतटीचा चाललेला हा सामना अचानक सिंधूने हिसकावला. कोरियन खेळाडूला हतबल करून सिंधूने हा सामना २१-१७ असा जिंकला आणि जेतेपदावर पुन्हा नाव कोरले. यंदाच्या सत्रातील तिचे हे पहिलेच जेतेपद असले, तरी जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्री. स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिला भारताच्या सायना नेहवालकडून पराभव पत्करावा लागला होता.
सिंधू पुन्हा चॅम्प
By admin | Updated: December 1, 2014 01:42 IST