नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेतील अखेरच्या फेरीस आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. आतापर्यंत ४0 वेळेचा चॅम्पियन मुंबईचा संघच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवू शकला आहे आणि उर्वरित सात स्थानांसाठी अखेरच्या राऊंडमध्ये घमासान होणार आहे.मुंबईचा संघ चार विजयांसह ब गटात अव्वल स्थानी आहे. मुंबईचे सात सामन्यांत ३२ गुण झाले आहेत आणि या गटात एकही संघ त्यांच्या बरोबरीपर्यंत पोहोचू शकत नाही; परंतु ब गटातून बाद फेरीसाठी अव्वल दोन संघ, अ गटातील तीन आणि क गटातील दोन संघ उद्या, बुधवारपासून एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. अ गटात नऊपैकी पाच संघ उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत आहेत. या पाच संघांत दिल्ली हा एकमेव संघ असून, त्यांचे पूर्ण आठ साखळीचे सामने पूर्ण असून, ते २५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याच गटात बंगाल आणि आसामचेही २५ गुण झाले आहेत. या दोन संघांत गुवाहाटी येथे लढत होणार आहे. या लढतीद्वारे या गटातील अव्वल संघ निश्चित होणार आहे.दिल्ली संघाला आसाम अथवा बंगाल संघाने थेट विजय मिळविण्याने फारसा फरक पडणार नाही. तथापि, दोन्ही संघांनी कमी गुण घेतले तर दिल्लीजवळ तिसरा संघ म्हणून बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी असेल.या तिन्ही सामन्यांच्या निकालावर दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर याची नजर असेल. दिल्लीने हंगामाच्या मध्यात खूप चांगली कामगिरी केली होती; परंतु त्यानंतर अखेच्या सामन्यात ढेपाळले गेल्यामुळे त्याचे नुकसान त्यांना सोसावे लागले.आसाम, बंगाल आणि कर्नाटक हे तिन्ही संघ पहिल्या डावातील आघाडी आणि तीन गुणांसह त्यांना बाद फेरीत पोहोचवू शकते.तमिळनाडू आणि पंजाब यांच्यादरम्यान डिंडगूल येथे होणारा सामना करा अथवा मरा असाच असणार आहे. उत्तर प्रदेशचा अखेरचा सामना ग्रेटर नोएडा येथे बडोदा संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी उत्तर प्रदेशला निर्णायक विजयाचीच आवश्यकता असणार आहे.या गटातील अन्य एक संघ मध्य प्रदेशची लढत आंध्र प्रदेशशी होणार आहे आणि सध्या १७ गुणांसह ते सहाव्या स्थानावर आहे. निर्णायक विजय मिळविल्यास मध्य प्रदेशसाठी बादफेरीचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे ब गटात परिस्थिती खूपच रोचक बनलेली आहे.सी गटातील दोन स्थानांसाठी चार संघात लढत होणार आहे. सौराष्ट्र चार विजय आणि २९ गुणांसह चांगल्या स्थितीत आहे. केरळ (२५), झारखंड (२४) आणि हिमाचल प्रदेश (२४) हेदेखील बाद फेरीच्या शर्यतीत आहेत.झारखंडचा अखेरचा सामना हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना हैदराबादेतच होणार आहे तर सौराष्ट्र संघ जम्मूत जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळेल. हिमाचल प्रदेश आणि केरळ यांच्यातील मलापुरम येथे होणारा सामना पूर्णपणे बादफेरीसारखाच असणार आहे. या लढतीतील विजयी संघ थेट नॉकआऊटसाठी पात्र ठरेल. झारखंड संघही निर्णायक विजयासह बादफेरीत पोहोचू शकतो. याच गटात सेना आणि त्रिपुरा यांच्यात सामना अगरतळा येथे आहे. सेनेच्या खात्यात २0 गुण आहेत आणि बोनस गुणांसह मिळवलेला विजय त्यांच्यासाठी नॉकआऊटचा मार्ग सुकर करू शकते. रणजी ट्रॉफीचे पुढील चार दिवस खूपच रोचक, रोमहर्षक आणि संघर्षपूर्ण ठरणार आहेत. - ‘ब’ गटात मुंबईचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे आणि त्यानंतर दोन स्थानांसाठी गुजरात (२३) आणि पंजाब (२0) प्रबळ दावेदार आहेत. उत्तर प्रदेश (१८) आणि तमिळनाडू (१८) यांच्याकडेही दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. गुजरातचा अखेरचा सामना बलाढ्य मुंबईविरुद्ध मुंबईतच आहे.त्याचप्रमाणे गत चॅम्पियन कर्नाटक आणि विदर्भ यांच्याजवळही ‘अ’ गटातून नॉकआऊट फेरीत जाण्याची संधी आहे. कर्नाटकचे २४ आणि विदर्भचे २२ गुण आहेत. कर्नाटकचा अखेरचा सामना पुणे येथे महाराष्ट्राविरुद्ध, तर विदर्भचा संघ नागपूरमध्ये हरियाणाविरुद्ध खेळेल. विदर्भ आणि कर्नाटक संघाने आपापले सामने जिंकले, तर दिल्लीच्या आशा मात्र संपुष्टात येऊ शकतात.
उपांत्यपूर्व फेरीच्या सात स्थानांसाठी होणार घमासान
By admin | Updated: December 1, 2015 03:14 IST