मेलबर्न : अमेरिकेची सेरेना विल्यम्स हिने आपली मोठी बहीण व्हीनसवर विजय नोंदवित आॅस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले. स्टेफी ग्राफला मागे टाकून सेरेनाने विक्रमी ऐतिहासिक २३ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावित नंबर वन टेनिसपटू होण्याचा मान संपादन केला आहे.सेरेनाने वर्चस्व गाजवित व्हीनसला ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमविले. मेलबर्न पार्कवर तिने सातवे विजेतेपद घेताना ओपनमधील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला. पहिल्या विजेतेपदानंतर सेरेनाने १८ वर्षांत हे यश कमाविले. ३५ वर्षांच्या सेरेनाने मागच्या वर्षी स्टेफीच्या २२ ग्रँडस्लॅमची बरोबरी केली होती. आता ती मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या तुलनेत एक पाऊल मागे आहे. व्हीनसविरुद्ध सेरेनाचा सामना पाहण्यास मार्गारेटदेखील प्रेसिडेन्ट बॉक्समध्ये उपस्थित होती.आजच्या जेतेपदाच्या बळावर सेरेना पुन्हा एकदा नंबर वन बनली. अँजेलिक केर्बरने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाचे साडेतीन वर्षांचे साम्राज्य मोडीत काढून नंबर वन स्थान हिसकावले होते. टेनिस कोर्टवर दोन्ही बहिणी कडव्या प्रतिस्पर्धी राहिल्या आहेत. मेलबर्न येथे १९ वर्षांआधी सेरेनाने ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण केले तेव्हा दुसऱ्या फेरीत व्हीनसने तिला नमविले होते. त्यानंतर दोघींनी एकमेकींविरुद्ध नऊ मोठ्या फायनल्स खेळल्या. दोघींना अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. १३ व्या मानांकित व्हीनसने ३६ वर्षांच्या वयात २००९ नंतर पहिल्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. पण तिला सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयश आले. दोन्ही बहिणींनी मंद सुरुवात केली. सुरुवातीच्या चार गेममध्ये दोघींचीही सर्व्हिस मोडीत निघाली. सेरेनाने मात्र महत्त्वपूर्ण ब्रेकसह ४-३ ने आघाडी घेत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सेरेनाची सुरुवात झकास झाली. सुरुवातीच्या दोन गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी स्वत:ची सर्व्हिस वाचविली. सेरेनाने तिसऱ्या गेममध्ये ब्रेकपॉर्इंट मिळविला. पण व्हीनसने तो वाचविताच ३-३ अशी बरोबरी झाली होती. सेरेनाने यानंतर व्हीनसची सर्व्हिस मोडीत काढून ४-३ ने आघाडी घेतली व थोड्याच वेळात सेटमध्ये सामन्यात आणि स्पर्धेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.(वृत्तसंस्था)
सेरेनाने जिंकले आॅस्ट्रेलियन ओपन
By admin | Updated: January 29, 2017 04:51 IST