मुंबई : सरस्वती स्कूल (मराठी) संघाने ठाण्यात सुरू असलेल्या सिंघानिया चषक शालेय क्रिकेट स्पर्धेत अनपेक्षित विजय मिळवताना कसलेल्या लोकपुरम स्कूलला २६ धावांनी धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले.अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून सरस्वती संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी लोकपुरम संघाने टिच्चून मारा करताना सरस्वती संघाच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. परंतु चार्वाक नाईकने केलेल्या नाबाद ७९ धावांच्या जोरावर सरस्वती संघाने निर्धारित ३० षटकांत ७ बाद १६८ अशी समाधानकारक मजल मारली. विक्रांत पगारेनेदेखील २३ धावा करताना चार्वाकला चांगली साथ दिली. लोकपुरमचा हुकमी खेळाडू प्रतीक अपसिंघेने २८ धावांत ४ बळी घेत सरस्वती संघाला मर्यादित धावसंख्येत रोखले.यावेळी लोकपुरम संघ सहज बाजी मारणार असे दिसत होते. मात्र सरस्वती संघाच्या गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पालटले. सरस्वती संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना लोकपुरम संघाचा डाव ३० षटकांत ५ बाद १४२ धावांवर रोखून २६ धावांनी निर्णायक बाजी मारली. चार्वाक, विक्रांत आणि स्वराज दळवी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. लोकपुरमकडून ओमकार सावर्डेकर (४६) आणि अक्षद श्रीवास्तव (३०) यांनी झुंजार खेळी केली. सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या चार्वाकची सामनावीर म्हणून निवड झाली.
सरस्वती संघाचा लोकपुरमला दणका
By admin | Updated: May 7, 2015 03:51 IST