नवी दिल्ली : रोम मास्टर्स स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सोमवारी जाहीर झालेल्या डब्ल्यूटीए विश्व रँकिंगमध्ये महिलांच्या दुहेरीत अव्वल स्थानी कायम आहे, तर रिओ आॅलिम्पिकमध्ये सातव्यांदा भारताकडून खेळण्याचे स्वप्न असणारा लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनादेखील एटीपी रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.सानियाने आपली जोडीदार स्वीत्झर्लंड येथील मार्टिना हिंगीस हिच्या साथीने रविवारी रोममध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. दोन्ही खेळाडू १२३६0 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहेत.पुरुष दुहेरीत भारतीय खेळाडू बोपन्ना एटीपी रँकिंगमध्ये दोन स्थानांच्या फायद्यासह ११ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याचप्रमाणे गत आठवड्यात चॅलेंजर्स विजेतेपद जिंकणारा लिएंडर पेसच्या रँकिंगमध्ये सातत्याने प्रगती सुरू असून तो चार स्थानांच्या फायद्यासह आता ५0 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे आशास्थान समजल्या जाणाऱ्या पेससाठी रँकिंगमधील प्रगती महत्त्वपूर्ण आहे. दुहेरीत अन्य भारतीय खेळाडू महेश भूपतीलादेखील तीन स्थानांचा फायदा होऊन तो आता १६६ व्या रँकिंगवर आहे.तथापि, पुरुष एकेरीत यूकी भांबरी आणि साकेत मिनैनी यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. यूकी १२ स्थानांनी घसरून १४४ व्या स्थानावर आला आहे, तर साकेतचे सहा स्थानांचे नुकसान झाले असून त्याची १४७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे; परंतु रामकुमार रामनाथनने रँकिंगमध्ये ४१ स्थानांनी जबरदस्त झेप घेतली असून तो १९९ व्या स्थानावर पोहोचला आहे. अनुभवी भारतीय खेळाडू सोमदेव देववर्मन ३१३ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)
सानिया मिर्झा ‘टॉप’वर
By admin | Updated: May 17, 2016 05:07 IST