सिडनी : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने बुधवारी यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजेतेपदाकडे कूच करताना सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सानिया-हिंगीस यांनी सलग २८ वा विजय मिळवताना महिला दुहेरीच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. अव्वल मानांकित सानिया-हिंगीस यांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या चेन लियांग-शुआई पेंग यांचा एक तासाहून कमी वेळ रंगलेल्या एकतर्फी सामन्यात ६-२, ६-३ असा फडशा पाडला. एकूणच सानिया-हिंगीस यांचा धडाका पाहता हा विक्रम नक्कीच मोडीत निघेल, याची खात्री टेनिसप्रेमींना आहे.गतवर्षी एकत्र आलेल्या सानिया-हिंगीस यांनी एकामागोमाग एक विजेतेपदांचा धडाका लावताना १० डब्ल्यूटीए दुहेरी स्पर्धा जिंकल्या. तसेच यंदाच्या वर्षाची दणक्यात सुरुवात करताना या अव्वल जोडीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जागतिक महिला दुहेरी टेनिस क्रमवारीतील अव्वल सानिया व द्वितीय हिंगीस यांनी आपल्या लौकिकानुसार दबदबा राखताना चिनी जोडीची दोन वेळा सर्व्हिस ब्रेक करताना सहजपणे वर्चस्व राखले.यानंतर दुसऱ्या सेटमध्येही लियांग व पेंग यांच्या कमजोर सर्व्हचा फायदा उचलताना सानिया-हिंगीस यांनी दणक्यात आगेकूच केली. टिमिया बाबोस-कॅटरिना श्रीबोटनिक विरुद्ध रालुका ओलारू- यारश्लोवा श्वेडोवा या सामन्यातील विजेत्या जोडीसह सानिया-हिंगीस यांची उपांत्य सामन्यात लढत होईल. (वृत्तसंस्था)
सानिया-हिंगीसचा विक्रमी विजय
By admin | Published: January 14, 2016 3:16 AM