जकार्ता : जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेली भारताची फुलराणी सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन स्पर्धेत विजयी सलामीसाठी संघर्ष करावा लागला. मंगळवारी झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत सायनाला चिनी तैपईच्या पाय यू पो हिने तीन सेटपर्यंत झुंजवले. त्याच वेळी मनू अत्री - अश्विनी पोनप्पा यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.पहिल्याच फेरीत सायनाने यू पो विरुद्ध एक तास तीन मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात २१-११, १९-२१, २१-१५ असा झुंजार विजय मिळवला. पहिल्यांदाच यू पो विरुद्ध खेळत असलेल्या सायनाने बचावात्मक भूमिका घेतल्यानंतर मोक्याच्या वेळी खेळ उंचावत बाजी मारली. दुसरीकडे मिश्र दुहेरीत मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सिंगापूरच्या योंग काय तेरी ही व वेई हान तान या जोडीने आक्रमक खेळ करताना भारताच्या अत्री - पोनप्पा जोडीचे आव्हान २१-१४, २७-२५ असे परतावून लावले. पहिल्या सेटमध्ये सहजपणे पराभूत झाल्यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. मात्र, दडपणाखाली झालेल्या चुकांचा फटका बसल्याने भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी सायनाला दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या फित्रियानी हिचे कडवे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानी असलेल्या फित्रियानीविरुद्ध सायनाचा रेकॉर्ड १-० असा आहे. गतमहिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतच सायनाने फित्रियानाला नमवले होते.
सायनाची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 03:39 IST