लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ही करिअरमध्ये प्रथमच अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा १९ ते २३ जुलै या कालावधीत होईल. २७ वर्षांची सायना २३ वैयक्तिक जेतेपदाची मानकरी आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) या स्पर्धेसाठी सायनाच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर केला. शनिवारी बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत निवड समितीने खेळाडूंची नावे जाहीर केली. पुरुष एकेरीत समीर वर्मा, प्रणय आणि कश्यप हे देशाचे प्रतिनिधित्व करतील. मिश्र प्रकारात अश्वनी पोनप्पा आणि सात्त्विक साईराज रेड्डी ही नवी जोडी खेळताना दिसेल. मागच्या महिन्यात सुदीरमन चषक स्पर्धेत या जोडीने दमदार कामगिरी केली होती.निवड समितीने २७ जून ते २ जुलै या कालावधीत आयोजित चायनीज तायपेई ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड, ११ ते १६ जुलैदरम्यान आयोजित कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स आणि २२ ते ३० जुलै या कालावधीत होणाऱ्या आशियाई ज्युनियर स्पर्धेसाठी संघ जाहीर केले. (वृत्तसंस्था)
सायना प्रथमच यूएस ओपन खेळणार
By admin | Updated: June 13, 2017 04:43 IST