जकार्ता : भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एसएस प्रणय यांनी पुरुष एकेरी गटात सरळ सेटमध्ये विजय मिळावत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तथापि, पारुपल्ली कश्यप याच्या पराभवाबरोबरच त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.या वर्षी इंडिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावणारा जगातील तृतीय मानांकित खेळाडू श्रीकांतने चिनी तैपईच्या सू जेन हाओ याचा २१-१४, २१-१५ असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला, तर जगातील १२ वा मानांकित खेळाडू प्रणयने युगांडा येथील एडविन एकिरिंग याच्यावर २१-१४, २१-१९ अशा सेटस्ने मात केली.तृतीय मानांकित श्रीकांत पुढील फेरीत १३ व्या मानांकित हाँगकाँगच्या हू यून याच्याशी दोन हात करणार आहे. हैदराबादच्या श्रीकांतने या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आतापर्यंतचे दोन्हीही सामने जिंकलेले आहेत.११ व्या मानांकित प्रणयला पुढील फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. जगातील सातव्या क्रमांकावर असणारा खेळाडू व्हिक्टरने गेल्या दोन लढतीत प्रणयवर मात केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन १० व्या मानांकित कश्यपने कडवी झुंज दिल्यानंतरही त्याला ३२ वर्षीय व्हिएतनामच्या टीएन मिन्ह एनगुएन याच्याविरुद्ध १ तास ५ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१७, १३-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)सायना उपउपांत्यपूर्व फेरीत : आॅलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने महिला ऐकरीच्या दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या चेंग नगान यीला ३४ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये २१-१३, २१-९ असे पराभूत करून उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली़ दुसरी मानांकित सायनाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता़ या सामन्यात सायनाने एकूण ४२ तर प्रतिद्वंदी चेंगने २२ गुण मिळवले़ सायनाचा पुढच्या फेरीतील सामना जपानच्या सयाका तकाहाशीविरुद्ध होईल़महिला दुहेरीत भारताची ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी दुसऱ्या फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली. विश्व चॅम्पियनशिप २०११ ची कास्यपदकविजेती ज्वाला आणि अश्विनी या १३ व्या मानांकित जोडीने सुए पेई चेन आणि वु टी जुंग या चीन तैपईच्या जोडीवर २१-१०, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.अन्य महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गदरे आणि सिक्की एन रेड्डी या जोडीला जपानच्या १४ व्या मानांकित शिजुका मातसुओ आणि मेमी नेइतो या जोडीकडून १७-२१, १९-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत प्रणय जॅरी चोपडा आणि अक्षय देवालकर या जोडीला मॅडस् कोनराड पेरटसन आणि मेडस् पीलर कोल्डिंग या डेन्मार्कच्या जोडीने २१-१६, २१-१२ असे पराभूत केले.
सायना, श्रीकांत, प्रणय विजयी
By admin | Updated: August 13, 2015 04:16 IST