सरावक : जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मोसमाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. सायनाने उपांत्य फेरीत धडक मारली. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेत्या सायनाने वर्चस्व गाजवताना आठव्या मानांकित इंडोनेशियाच्या फितरियानीचा २१-१५, २१-१४ ने पराभव केला. जागतिक क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सायनाचा हा तिसरा विजय आहे. अव्वल मानांकित सायनाने गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजमध्ये जेतेपद पटकावले होते. उपांत्य फेरीत सायनाला हाँगकाँगच्या यिप पुई यिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तिच्याविरुद्ध सायनाचा रेकॉर्ड ६-२ असा आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या अजय जयरामला इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिनटिंगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. गिनटिंगने सहावे मानांकनप्राप्त जयरामचा २१-१३, २१-८ ने पराभव केला.या इंडोनेशियन खेळाडूविरुद्ध जयरामचा हा तिसरा पराभव आहे. यापूर्वी जयरामला हैदराबादमध्ये आशिया टीम चॅम्पियनशिप व फ्रेंच ओपन स्पर्धेतही त्याच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)
सायना उपांत्य फेरीत
By admin | Updated: January 21, 2017 05:03 IST