चायना ओपन : जपानच्या खेळाडूवर मातफुझोऊ (चीन) : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली महिला खेळाडू आणि गत चॅम्पियन भारताच्या सायना नेहवाल हिने जपानच्या नोजोमी ओकुहारा हिचा शुक्रवारी २१-१६, २१-१३ असा सलग गेममध्ये पराभव करताना चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.स्पर्धेतील भारताचे एकमेव आव्हान बाकी असलेल्या अव्वल मानांकित सायना हिने जपानच्या खेळाडूचा अवघ्या ४२ मिनिटांत धुव्वा उडवला. सायना आता आपले विजेतेपद आपल्याकडे कायम ठेवण्याच्या दोन पावले दूर आहे; परंतु उपांत्य फेरीत तिला सातव्या मानांकित चीनच्या वांग यिहान हिचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे.सायनाने जागतिक क्रमवारीतील १० व्या मानांकित खेळाडू ओकुहारा हिच्याविरुद्ध सलग चौथा विजय मिळवला आहे. सायनाने यावर्षी आशियाई चॅम्पियनशिपमध्येदेखील ओकुहारा हिला नमवले होते.सायनाला गेल्या काही स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवता आला नव्हता; परंतु चायना ओपनमध्ये तिला पुन्हा सूर गवसला असून तिने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी चायना ओपन जिंकल्यानंतर सायनाच्या कारकिर्दीतील कामगिरी उंचावली होती व त्यानंतर तिने त्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती.आज पहिल्या गेममध्ये जपानी खेळाडूने सुरुवातीला ५-२ अशी आघाडी घेतली; परंतु सायनाने सलग चार गुण नोंदवले आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने आघाडी ८-५, १०-७, १४-९ आणि १७-१२ अशी मजबूत करताना पहिला गेम २१-१६ असा जिंकला.दुसऱ्या गेममध्येदेखील सायनाच्या दमदार खेळासमोर जपानच्या ओकुहाराने शरणागती पत्करली. सायनाने दुसऱ्या गेममध्ये ६-२ अशी आघाडी घेतली आणि नंतर सलग पाच गुण घेत आघाडी ११-३ अशी वाढवली.जपानच्या खेळाडूने मुसंडी मारण्याचा प्रयत्न करताना ९-१३ अशी आघाडी कमी केली; परंतु सायनासमोर तिचा संघर्ष फार काळ टिकू शकला नाही आणि सायनाने हा गेम आणि सामनाही २१-१३ असा जिंकला.सायनाची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी जागतिक क्रमवारीतील आठव्या स्थानी असणारी चीनची वांग यिहान ही आहे. सायनाचा या चीनच्या खेळाडूविरुद्धचा कारकिर्दीतील रेकॉर्ड ३-९ आहे; परंतु या वर्षी आॅल इंग्लंड आणि विश्वचॅम्पियनशिप या दोन्ही लढतींत सायनाने यिहानला पराभूत केले होते. सायनाने या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास ती २०१५ मध्ये यिहानविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदवू शकते. यिहान हिने अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित चीन तैपेईच्या तेई जू यिंग हिचा २१-१८, २१-१७ असा ३९ मिनिटांत पराभव केला.
सायना नेहवाल उपांत्य फेरीत
By admin | Updated: November 14, 2015 01:13 IST