फुजाऊ (चीन) : गत चॅम्पियन सायना नेहवालने चीन ओपन सुपर सिरीज प्रीमिअर लीग बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत २०११ची विश्व चॅम्पियन व २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची मानकरी ठरलेल्या चीनच्या यिहान वँगचा २१-१३, २१-१८ ने पराभव केला. सायनाला या स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. यिहानविरुद्ध ९ वेळा पराभव स्वीकारणाऱ्या सायनाने आजच्या लढतीत आपला अनुभव पणाला लावला. पहिल्या गेममध्ये २-४ ने पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने जोरदार पुनरागमन केले तर दुसऱ्या गेममध्ये सायनाने यिहानची झुंज मोडून काढली. अव्वल मानांकित भारतीय खेळाडूला अंतिम फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या शुएरुईच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सायनाला यापूर्वी शुएरुईविरुद्ध ९ वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. सायनाला शुएरुईविरुद्ध केवळ दोनदा (२०१२ इंडोनेशिया ओपन व २०१० मध्ये सिंगापूर ओपन) विजय मिळवता आला. शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत सायनाने संथ सुरुवात केली. चीनच्या खेळाडूने एकवेळ ५-३ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सायनाने सलग सहा गुण वसूल करीत ९-५ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला खेळ थांबला त्या वेळी सायनाने ११-७ अशी आघाडी घेतली होती. यिहानने त्यानंतर ११-११ अशी बरोबरी साधली. सायनाने त्यानंतर १४-१३च्या स्कोअरवरून सलग सात गुण वसूल करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी अनेकदा एकमेकांविरुद्ध आघाडी घेतली. सायनाने एकवेळ ९-६ अशी आघाडी घेतली होती, पण यिहानने १०-१० अशी बरोबरी साधली. सायनाने त्यानंतर १३-११ अशी आघाडी घेतली आणि अखेपर्यंत आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
सायना अंतिम फेरीत
By admin | Updated: November 14, 2015 23:03 IST