नवी दिल्ली : यंदाच्या सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारावर मोहोर उमटवणारे भारताचे माजी दिग्गज यष्टिरक्षक- फलंदाज सय्यद किरमाणी यांनी भारताचा कसोटी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाचे कौतुक करताना तो धोनीचा खरा वारसदार असल्याचे मत व्यक्त केले.राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरमाणी यांनी सांगितले, की साहा शानदार खेळाडू असून त्याच्यात नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरली आहे. तो मुळातच यष्टिरक्षक आहे, तरी त्याला अजून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. तो संघासाठी उपयुक्त फलंदाजही असून दोन शतके झळकावून त्याने हे सिद्ध केले आहे. जर कर्णधाराला चांगल्या यष्टिरक्षकाची साथ मिळाली, तर त्याच्यावरील बरेच दडपण कमी करण्यात यष्टिरक्षक निर्णायक भूमिका बजावतो. साहामध्ये धैर्याने फलंदाजी करण्याची क्षमता असून तो तांत्रिकदृष्ट्या खूप मजबूत आहे.साहा अजून युवा खेळाडू असून त्याला प्रत्येक सामन्यातून शिकावे लागेल. मी त्याला यष्टिरक्षण व फलंदाजी करताना पाहिले आहे आणि त्याच्या खेळीने मी प्रभावित झालो आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की येणाऱ्या काळात तो भारताचा माजी कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा वारसदार बनू शकतो, असेही किरमाणी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)धोनीला कोणाच्याही कौतुकाची आवश्यकता नाही. त्याने विकेटच्या मागे ज्याप्रकारे आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे, त्याचप्रमाणे एक कर्णधार म्हणून त्याने देशात क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेले आहे. तो देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याचे नेतृत्वकौशल्य सगळ्यांपेक्षा वेगळे आहे.- सय्यद किरमाणी, माजी यष्टिरक्षक
साहा हाच धोनीचा खरा वारसदार
By admin | Updated: December 26, 2015 02:54 IST