मॉस्को : सरकारपुरस्कृत डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियाच्या अॅथलिटस्वर रिओ आॅलिम्पिकला अवघे नऊ महिने शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातून अस्थायीरीत्या निलंबित केले.आयएएएफचे अध्यक्ष सॅबेस्टियन को म्हणाले, ‘‘आम्ही रशियाच्या अॅथलेटिक्स महासंघाच्या अपयशी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर अस्थायी निलंबनाचा निर्णय घेतला. खेळात कुठल्याही प्रकारची बनवाबनवी खपवून घेतली जाणार नाही. ही घटना सर्वांना डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे.’’ विश्व डोपिंगविरोधी एजन्सीच्या (वाडा) स्वतंत्र आयोगाने रशियावर डोपिंगमध्ये पूर्णपणे बुडाल्याचा ठपका ठेवला होता. यामुळे आॅलिम्पिकमधील सर्वात महत्त्वाच्या अॅथलेटिक्स प्रकाराला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, एआरएएफचे काळजीवाहू प्रमुख वादीम झेलिचेनोक यांनी आयएएएफने रशियाच्या खेळाडूंवर लावलेली बंदी दुर्दैवी असल्याचे संबोधून या परिस्थितीतून वाट काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे म्हटले आहे. वादीम म्हणाले, ‘अॅथलेटिक्स महासंघाद्वारे रशियावर लावलेली बंदी दुर्दैवी आहे. (वृत्तसंस्था)
रशियाच्या अॅथलिटवर बंदी
By admin | Updated: November 14, 2015 23:01 IST