नवी दिल्ली : हॉकी इंडिया (एचआय)चे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याशी झालेल्या वादामुळे प्रकाशझोतात आलेले भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वॉन एस यांनी पुन्हा परतण्यासाठी काही अटी ठेवल्या असून, कामात पूर्णपणे स्वातंत्र दिल्यासच आपण आपल्या पदावर परतू, असे त्यांनी सांगितले आहे.बत्रा आणि हॉकी संघाचे प्रशिक्षक वॉन यांच्यातील वाद आता जगजाहीर झाला आहे. बत्रा यांनी आपल्याला पदावरून हटवले असल्याचे वॉन यांनी सोमवारी म्हटले होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या नेतृत्वातील संघाने बेल्जियमच्या एंटवर्प येथे हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये मलेशियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामनादेखील खेळला होता. त्यानंतर बत्रा यांनी माजी आॅलिम्पियन हरबिंदरसिंह यांच्या नेतृत्वात विशेष समिती नेमण्याचा निर्णय घेतला. ही समिती शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत वॉन एस. यांच्या भविष्यावर विचार करणार आहे. मीडियात आलेल्या वृत्तांनुसार वॉन एस. यांनी पुन्हा आपल्या पदावर परतण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.वॉन एस. म्हणाले की, ‘माझ्याविषयी काय निर्णय घेतला जातो हे पुढे पाहता येईल; परंतु वास्तव हे आहे की प्रशिक्षक पदावर पुन्हा येण्यासाठी अजूनपर्यंत माझ्याशी चर्चा करण्यात आलेली नाही. एंटवर्प येथील स्पर्धेच्या एका आठवड्याच्या आतच मला पदावरून हटविण्यात आले. आता मला अधिकृत विधानाची प्रतीक्षा आहे. जे काही झाले त्यात मी योग्य आहे. मी कधीही माझे पद सोडण्याविषयी विचार केला नाही; परंतु जेव्हा स्वत:लाच हटविण्यात आले तर तुम्ही काय करू शकता; परंतु आता मी पुन्हा परतण्यासाठी तयार आहे; परंतु त्याआधी मी संघ व्यवस्थापनासोबत विचारविनिमय करू इच्छितो. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की, माझ्या कामात त्या लोकांनी हस्तक्षेप करू नये आणि माझ्या कामात स्वातंत्र्य असावे.’
कामात स्वातंत्र्य दिल्यासच परतू : वॉन एस
By admin | Updated: July 23, 2015 22:58 IST