अॅडिलेड : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमदने वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने रविवारी ‘जायंट किलर’ आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव केला आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयाने पाकिस्तानने २००७ मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणारा आयर्लंडचा कर्णधार विलियम पोर्टरफिल्डने (१०७ धावा, १३१ चेंडू, ११ चौकार, १ षट्कार) शतकी खेळी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारून दिली. पोर्टरफिल्डचे वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. पोर्टरफिल्डचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना पाकिस्तानच्या माऱ्याला यशस्वीपणे सामोरा जाता आले नाही. आयर्लंडचा डाव ५० षटकांत २३७ धावांत संपुष्टात आला. लक्ष्याचा पाठलाग करताना सरफराज व अहमद शहजाद (६३) यांनी सलामीला १२० धावांची भागीदारी करीत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. सरफराजने सलग दुसऱ्या सामन्यात आपली निवड सार्थ ठरविली. त्याने १२४ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०१ धावा फटकावल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर त्याने कर्णधार मिसबाह उल-हकच्या (३९) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानने ४६.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. आठ वर्षांपूर्वी विंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. रविवारी खेळल्या गेलेल्या ‘ब’ गटाच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने यूएईचा पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने आज खेळाच्या सर्वंच विभागात सरस कामगिरी करीत ६ सामन्यांत ८ गुणांची कमाई केली आणि बाद फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानला २० मार्चला अॅडिलेड ओव्हलवर आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आयर्लंड व वेस्ट इंडीज संघांच्या खात्यावर प्रत्येकी सहा गुणांची नोंद आहे; पण विंडीजने सरस नेटरनरेटच्या आधारावर आगेकूच करण्यात यश मिळविले. पाकिस्तानच्या विजयाचा पाया गोलंदाजांनी रचला. वेगवान गोलंदाज वहाब रियाज पाकिस्तानतर्फे सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५४ धावांत ३ बळी घेतले. सोहेल खान व राहत अली यांनी २-२ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना सरफराज व शहजाद यांनी सावध पवित्रा स्वीकारला. पाकने १९व्या षटकांत धावसंख्येचे शतक गाठले. शहजादला (६३ धावा, ७१ चेंडू, ७ चौकार) थॉम्पसनने माघारी परतवत आयर्लंडला पहिले यश मिळवून दिले. हॅरिस सोहेल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. वैयक्तिक शतकाच्या उंबरठ्यावर असताना सरफराजने संथ फलंदाजी केली. सरफराजला शतक पूर्ण करण्यासाठी उमर अकमलला (नाबाद २०) कसोटी क्रिकेटच्या शैलीची फलंदाजी करावी लागली. सरफराजने डाकरेलच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करीत १२० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. २००७ मध्ये इम्रान नजीरने शतकी खेळी केल्यानंतर पाकिस्तानतर्फे विश्वचषक स्पर्धेत हे पहिले शतक ठरले. मिसबाहने अॅडिलेडच्या पाटा खेळपट्टीवर वेगाने धावा फटकावल्या. अॅलेक्स कुसॅकच्या गोलंदाजीवर ‘हिट विकेट’ ठरण्यापूर्वी मिसबाहने डाकरेल व केव्हिन ओब्रायनला षट्कार ठोकले. त्याआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नियमित अंतरात बळी घेत आयर्लंडवर वर्चस्व कायम राखले. (वृत्तसंस्था)
हिशेब फिट्टमफाट
By admin | Updated: March 16, 2015 02:15 IST