नवी दिल्ली : भारतीय हॉकी प्रशिक्षक पॉल वॅन एस. यांच्या आरोपास प्रत्युत्तर देताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी जर आपले वर्तन हे हुकूमशहासारखे वाटत असेल, तर आपण आपल्या पदाचा त्याग करण्यास तयार असल्याचे सांगितले.बत्रा यांच्या दबावामुळे आपण राजीनामा दिला होता, असा आरोप वॅन एस. यांनी बत्रा यांच्यावर लावला होता. बत्रा यांनी वॅन हे चांगले प्रशिक्षक नसल्याचे सांगून प्रशिक्षकाच्या भविष्याचा निर्णय शुक्रवारी विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे बत्रा यांनी संघाचे माजी प्रशिक्षक वॅन एस. यांना ‘असभ्य’ संबोधताना सांगितले, की बेल्जियमच्या एंटवर्प वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनल्सदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता; परंतु आपण कधीही एस. यांना त्यांच्या पदावरून हटवण्याविषयी बोललो नव्हतो. एस. यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे मुख्य कारण हे बत्रा यांचे ‘हुकूमशाही वर्तन’ असे म्हणून नव्या वादाला जन्म दिला होता. बत्रा म्हणाले, ‘पॉल एक चांगले मॅनेजर आहेत आणि खेळाडूंना ते प्रेरणा देतात; परंतु ते एक चांगले प्रशिक्षक नाहीत.(वृत्तसंस्था)
..तर पदाचा त्याग करण्यास तयार
By admin | Updated: July 23, 2015 16:35 IST