नवी दिल्ली : भारताचा माजी आॅफ स्पिनर रमेश पोवार याने मंगळवारी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यासह त्याची १५ वर्षांची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. ३७ वर्षीय पोवारने २००४ ते २००७ दरम्यान भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामनेदेखील खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ६ व ३४ विकेट घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना पोवारने शानदार कामगिरी करताना तब्बल ४४२ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. साईराज बहुतुलेच्या साथीने त्याने टिच्चून मारा करताना मुंबईच्या गोलंदाजीला धार आणली होती. या दोघांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबईने अनेकवेळा रणजी ट्रॉफीवर कब्जा केला. सतत होणाऱ्या दुखापती आणि अतिवजनाच्या कारणामुळे अनेकदा पोवार संघाबाहेर होत असे. आपल्या कारकीर्दीच्या अंतिम क्षणी त्याने राजस्थान आणि गुजरात संघाचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान, यापुढे सचिन - वॉर्न यांच्या मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलेल्या पोवारने सांगितले, की मी नेहमीच क्रिकेटवर प्रेम केले असून कायम या खेळाची प्रामाणिकपणे सेवा केली. यापुढे कोणत्याही स्वरूपातून मी क्रिकेटशी जोडून राहण्याचा प्रयत्न करेल. (वृत्तसंस्था)
रमेश पोवारने जाहीर केली निवृत्ती
By admin | Updated: November 10, 2015 23:18 IST