चेन्नई : दोन चारदिवसीय सामन्यांच्या अनधिकृत मालिकेमध्ये भारत ‘अ’ संघाने सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाविरुद्ध ६ बाद २२१ अशी समाधानकारक मजल मारली. भारताच्या मुख्य संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राहुल आणि पुजारा यांनी अनुक्रमे ९६ व ५५ धावांची खेळी केली.चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिनव मुकुंद आणि राहुल या सलामीच्या जोडीने आक्रमक सुरुवात करताना आॅस्टे्रलियाच्या गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुकुंद अतिआक्रमणाच्या नादात बाद झाल्याने भारताला दुसऱ्याच षटकात पहिला झटका बसला. मुकुंदने ६ चेंडूंमध्ये २ खणखणीत चौकारांसह ९ धावा काढल्या.यानंतर मात्र राहुल आणि पुजारा या टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाजांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेताना आॅसी गोलंदाजांचा घाम गाळला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. सर्वांचे लक्ष लागलेल्या पुजाराने अत्यंत सावधपणे खेळताना अतिरिक्त आक्रमण टाळले. त्याच वेळी खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेताना त्याने ७ वेळा चेंडू सीमापार धाडला. अर्धशतक झळकावल्यानंतर तो लगेच बाद झाला. त्याने १२२ चेंडूंचा सामना करताना ५५ धावांची संयमी खेळी केली. पुजारा बाद झाल्यानंतर करुण नायर (०) आणि श्रेयश अय्यर (३९) फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने भारताची ४ बाद १८७ अशी अवस्था झाली. दुसऱ्या बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या राहुलने शतकाकडे कूच केली. मात्र, शतकापासून चार धावा लांब असताना सीन अॅबोटच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. राहुलने १८५ चेंडूंत १४ चौकारांस ९६ धावा फटकावल्या. यानंतर नमन ओझा (१०) देखील लगेच बाद झाला. विजय शंकर (नाबाद ४) आणि अमित मिश्रा (नाबाद ०) सध्या खेळपट्टीवर टिकून असून भारत ‘अ’ने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली आहे. आॅस्टे्रलियाकडून अँड्र्यू फेकेटे याने ३८ धावांत २ बळी घेतले. स्टीव्ह ओकीफी यानेदेखील ६६ धावांत २ बळी घेत अँड्र्यूला चांगली साथ दिली. तर गुरिंदर संधू आणि सीन अॅबोट यांनी प्रत्येकी १ बळी घेत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला.
राहुल, पुजारा यांची अर्धशतके
By admin | Updated: July 23, 2015 16:35 IST