नवी दिल्ली : अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने चार वर्षांनंतर आज वन-डे संघात पुनरागमन केले, तर निवड समितीने पुढील महिन्यात आयोजित झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेत दुय्यम दर्जाच्या संघाची निवड केली. यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने वन-डे संघात पुनरागमन केले असून, वेगवान गोलंदाज संदीप शर्मा व लेग स्पिनर कर्ण शर्मा यांचा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात समावेश करण्यात आला. सलामीवीर मुरली विजय, अंबाती रायडू व भुवनेश्वर कुमार या सिनिअर खेळाडूंची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी संघ जाहीर केला. गेल्या काही कालावधीपासून दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मनोज तिवारीचे पुनरागमन झाले आहे. त्याला सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीचा लाभ मिळाला. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, ‘‘बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे भविष्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप क्रिकेट स्पर्धेबाबत विचार करताना या संघाची निवड करण्यात आली. आम्ही विश्वकप स्पर्धेसाठीही सर्वोत्तम संघाची निवड केली होती. भविष्यातील मालिकांचा (श्रीलंका दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळली जाणारी मालिका व टी-२० विश्वकप) विचार करता आम्ही विश्रांतीची गरज असलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.’’ भारतीय संघाने या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धची मालिका १-२ ने गमावली. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात हरभजन सिंग, अक्षर पटेल व कर्ण शर्मा हे तीन स्पेशालिस्ट फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा व स्टुअर्ट बिन्नी सांभाळतील. पाटील यांनी बांगलादेश दौऱ्यात कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनबाबत बोलताना सांगितले, की ही प्रदीर्घ कालावधीसाठीची संघनिवड नाही, पण गेल्या मालिकेत हरभजनची कामगिरी बघता त्याला संधी मिळणे आवश्यक होते. निवड समितीचे काम सर्वोत्तम उपलब्ध संघाची निवड करणे आहे. उर्वरित सर्व काही संघव्यवस्थापनावर अवलंबून आहे. संघाची निवड झाल्यानंतर अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी कर्णधाराची असते.फलंदाजीची भिस्त रहाणे, विजय, रायडू, तिवारी, मनीष पांडे व केदार जाधव यांच्यावर अवलंबून राहील. बीसीसीआयचे सचिव ठाकूर म्हणाले,‘‘हा चांगला संघ आहे. युवा खेळाडूंची निवड करणे म्हणजे आगेकूच करणे आहे.’’ विश्रांती देण्यात आलेल्या सिनिअर खेळाडूंमध्ये वन-डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, आॅफ स्पिनर आर. आश्विन आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) रहाणेची कारकीर्द :एकदिवसीय क्रिकेटमध्ये पर्दापण : ३ सप्टेंबर २०११ विरुद्ध इंग्लंडसामने : ५५; डाव : ५४; नाबाद : ०२; धावा : १,५९३; फलंदाजी सरासरी : ३०.६३; शतके : ०२; अर्धशतके : ०९; चौकार : १५८; षटकार : १९; झेल : २७; टॉप स्कोर : १११.टी-२० पर्दापण : ३१ आॅगस्ट २०११ विरुद्ध इंग्लंड; शेवटची टी-२० : ७ सप्टेंबर २०१४ विरुद्ध इंग्लंड टी-२० : सामने : ११; डावा : ११; धावा : २३६; टॉप स्कोर ६१; सरासरी : २१.४५; अर्धशतके : ०१;चौकार : २१; षटकार : ०६; झेल : ११ भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, अक्षर पटेल, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.भारतीय संघात समावेश झाल्यामुळे खूप उत्साही आहे. ही एक चांगली संधी असून, या दौऱ्यात चांगली कामगिरी करून मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेन. माझ्या या यशाचे श्रेय आई-बाबा व पत्नीला आहे. ते ठामपणे माझ्या मागे उभे राहिल्याने इथपर्यंत पोचू शकलो. - केदार जाधव, भारतीय संघातील फलंदाज
रहाणे कर्णधार; हरभजनचे वन-डे संघात पुनरागमन
By admin | Published: June 30, 2015 2:17 AM