जकार्ता : भारताची पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत दोन वेळा (२०१३ व २०१४) कांस्यपदक जिंकलेल्या ११ व्या मानांकित सिंधूने चुरशीच्या झालेल्या लढतीत डेन्मार्कच्या लाइन जार्सफेल्टचा ११-२१, २१-१७, २१-१६ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. विश्व क्रमवारीत १३ व्या नंबरवर असलेली सिंधू या सत्रात दुखापतीमुळे त्रस्त होती.तिसऱ्या फेरीत बाय मिळालेली सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत आॅलिम्पिक विजेती व नंबर वन खेळाडू चीनची ली शुएरुईविरुद्ध खेळेल. विश्व क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या श्रीकांतने पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या मायकल फरिमनला २१-१०, २१-१३ गुणांनी फक्त २४ मिनिटांत नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. इंडियन ओपन विजेता श्रीकांतला पुढच्या फेरीत चिनी तैपेईच्या सू जेन हाओविरुद्ध खेळावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)
पी.व्ही. सिंधू, के. श्रीकांत दुसऱ्या फेरीत
By admin | Updated: August 12, 2015 04:15 IST