ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. १७ - किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहालीच्या मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंटस संघावर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पुण्याचे १५३ धावांचे लक्ष्य १८.४ षटकात पार केले आणि आयपीएलच्या नवव्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
सलामीवीर मुरली विजय (५३) आणि मनन व्होरा (५१) यांनी शानदार अर्धशतके झळकवून विजयाची पायाभरणी केली. खाली आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १४ चेंडूतील नाबाद ३२ धावांची स्फोटक खेळी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुरली विजय आणि मनन व्होराने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली.
फा ड्यु प्लेसिसच्या (६७) धावा आणि स्टीव्हन स्मिथच्या (३८) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या रायझिंग पुणे सुपर जायटंस संघाने निर्धारीत वीस षटकात सात बाद १५२ धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य दिले होते.
ड्यु प्लेसिसने पीटरसनसोबत दुस-या विकेटसाठी ५५ आणि स्मिथसोबत चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची केलेली भागीदारी महत्वपूर्ण ठरली. या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर अजिंक्य रहाणेला (९) धावांवर संदीप शर्माने बोल्ड केले. कर्णधार महेंद्रसिंह धोनी अवघी एक धाव करुन तंबूत परतला.
पंजाबकडून मोहित शर्माने सर्वाधिक तीन, संदीप शर्माने दोन आणि अबॉटने एक गडी बाद केला. पुणे संघाचा स्पर्धेतील दुसरा तर, पंजाबचा विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न असेल.