मोहाली : आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले आॅफसाठी पात्र ठरलेल्या किंग्ज इलेव्हन संघाचे मनोधैर्य उंचावलेले असून,बुधवारी गृहमैदानावर मुंबईविरुद्ध खेळल्या जाणार्या लढतीत यजमान संघ विजय मिळविण्यास उत्सुक आहे. सातव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेला गतविजेता मुंबई संघ विजयाची मालिका कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. पंजाब संघाने या स्पर्धेत प्रत्येक संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब संघ गृहमैदानावर खेळल्या जाणार्या लढतीत विजय मिळवीत गुणतालिकेत अव्वलस्थानावरील पकड घट्ट करण्यास प्रयत्नशील आहे. पंजाब संघाने या स्पर्धेत ९ सामन्यांत विजय मिळविले असून, त्यांच्या खात्यावर १८ गुणांची नोंद आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पंजाब संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळविताना शानदार कामगिरी केली. यापूर्वी पंजाब संघाने २००८ मध्ये या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. ‘आॅरेंज कॅप’चा मानकरी ग्लेन मॅक्सवेल संघाचा स्टार खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेलने या स्पर्धेत ५३१ धावा फटकाविल्या आहेत. युवा खेळाडू संदीप शर्मा, मनन व्होरा आणि अक्षर पटेल यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. वीरेंद्र सेहवागच्या समावेशामुळे पंजाब संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. मोठी धावसंख्या उभारणे पंजाब संघाच्या यशाचे रहस्य आहे. कर्णधार जॉर्ज बेली म्हणाला, की प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे. विजयामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. टी-२० मध्ये ही बाब महत्त्वाची आहे. पंजाब संघाने या स्पर्धेत दोनदा २०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. गोलंदाजीमध्ये पीसीए स्टेडियममधील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघाला संदीप शर्मासह बॅरोन हेन्ड्रिक्सकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. दुसर्या बाजूचा विचार करता मुंबई संघापुढे बुधवारच्या लढतीत यजमान पंजाब संघाला पराभूत करण्याचे आव्हान राहील. मुंबई संघाला या पर्वात ११ पैकी केवळ चार सामन्यांत विजय मिळविता आला. मुंबई संघाची भिस्त लेंडल सिमन्स व माईक हसी यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत या दोघांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. त्यांनी अनुक्रमे ६२ व ५६ धावा फटकाविल्या होत्या. मुंबई संघाला सिनियर गोलंदाज आॅफ स्पिनर हरभजनसिंगकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. मुंबई संघात स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
मुंबईवर विजय मिळविण्यास पंजाब उत्सुक
By admin | Updated: May 21, 2014 02:39 IST