कोलंबो : चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत नाबाद राहणारा भारताचा चौथा आणि जगातील ४५ वा फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात हा विक्रम नोंदवला. प्रदीर्घ कालावधीनंतर अंतिम संघात स्थान मिळालेल्या पुजारावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद होत असताना पुजाराने एक टोक सांभाळून ठेवले आणि अखेर १४५ धावा काढून नाबाद राहिला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या आहेत. द्रविडने नाबाद १४६ धावांची खेळी केली होती. द्रविड पुजाराप्रमाणे आपल्या आवडीच्या तिसऱ्या स्थानाऐवजी सलामीला आला होता, हा योगयोग आहे.आॅस्ट्रेलियाचे वुडफुल आणि बिल लॉरी, इंग्लंडचे लेन हटन आणि न्यूझीलंडचे ग्लेन टर्नर यांनी अशी कामगिरी प्रत्येकी दोनदा केली आहे. भारतातर्फे सुनील गावस्कर यांनी हा विक्रम सर्वप्रथम नोंदवला त्यांनी १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबादमध्ये हा विक्रम नोंदवताना नाबाद १२७ धावांची खेळी केली होती. वीरेंद्र सेहवागने २००८ मध्ये गॉल कसोटीमध्ये नाबाद २०१ धावांची खेळी करीत गावस्कर यांच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. राहुल द्रविडने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीमध्ये हा विक्रम नोंदवला.(वृत्तसंस्था)
पुजारा नाबाद राहणारा चौथा सलामीवीर
By admin | Updated: August 30, 2015 22:49 IST