न्यूयॉर्क : मुंबईचा वयस्क फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडुन खेळणारा प्रवीण तांबे अमेरिकेतील एका टी-२० सामन्यात वादग्रस्त खेळाडूसह खेळल्याने वादात अडकला आहे. अमेरीकेत झालेल्या एका अनधिकृत टि-२० सामन्यात ४३ वर्षीय तांबे फिक्सिंगचे आरोप लागलेल्या बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अश्रफुलसह खेळला. यावरुन तो आता वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे.प्रवीण तांबेने देखील याबाबत कबुली देताना सांगितले की, त्याने हा सामना खेळण्याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) मान्यता घेतली नव्हती. इग्लंडमध्ये लीव्हरपूल लीगमध्ये खेळत असलेला तांबे २३ ते ३१ जुलै दरम्यान विश्रांतीसाठी अमेरीकेत गेला होता. एका क्रिकेट वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तांबेने २७ जुलैला लॉरेन हिल क्रिकेट स्पर्धेत अश्रफुलसह गुजरात सीसी ज्युनियर्स संघाकडून बुल्स विरुध्द एक सामना खेळला. याबाबत त्याने अधिक माहिती देताना सांगितले की, ‘ही एक अमान्य स्पर्धा आहे याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. येथे मी केवळ मित्रांसोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी आलो होतो. मी माझे क्रिकेटचे किट देखील सोबत आणले नव्हते.’२६ जुलैला होमडेल सीसी संघाकडुन सामना खेळल्यानंतर तांबेला संघसहकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सराव सामना असल्याचे सांगितले. यावेळी तांबेला २७ तारखेला मैदानात गेल्यानंतर अश्रफुल देखील खेळणार असल्याचे कळाले. याविषयी त्याने सांगितले की. ‘मला सराव सामना असल्याचे सांगितले होते. मात्र मैदानात गेल्यानंतर कळाले की तो सराव सामना नव्हता. (वृत्तसंस्था)
प्रवीण तांबे वादाच्या भोवऱ्यात..
By admin | Updated: August 5, 2015 23:34 IST