विनय नायडू, मुंबईइंग्लंड दौ-यातील खेळाडूंच्या खराब कामगिरीला त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणींना जबाबदार धरणे चुकीचे असून खेळाडूंच्या पत्नी किंवा मैत्रिणींना दौ-यावर न जाऊ दिल्यास मोठी समस्या निर्माण होतील, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या जोडीदाराला (मग तो कोणीही असो) सोबत नेण्यास परवानगी देण्यात यावी असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रवीड याने व्यक्त केले आहे.क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या सी. के. नायडू सभागृहात झालेल्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना द्रवीड म्हणाला, हा एक गंभीर मुद्दा आहे. अलिकडील काळात क्रिकेट खूप वाढले आहे. वर्षातील ९-१0 महिने खेळाडू क्रिकेट खेळत असतात. इतका काळ ते आपल्या कुटुंबापासून बाहेल राहीले तर समस्या आणखी वाढतील. खेळाडू ‘होमसिक’ बनतील. त्यामुळे खेळाडूंना पत्नी किंवा मैत्रिणीला सोबत नेण्यास परवानगी दिली पाहिजे. खेळाडूंची मानसिकता आपण समजावून घेतली पाहिजे.दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात द्रवीडने सांगितले की, एकदिवसीय सामन्यांचे आकर्षण आता संपत आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेशिवाय वनडे सामने निरर्थक आहेत. वनडे द्विपक्षीय मालिका कमी करायला हव्यात. भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या या महान खेळाडूने असाही सल्ला दिला की युवा खेळाडूंनी क्रिकेटच्या तिनही प्रकारात प्राविण्य मिळवले पाहिजे. तू कोणता प्रकार निवडशील असे विचारले असता तो म्हणाला, ‘सर्व प्रकार, मात्र व्यक्तिश: मला कसोटी खेळायला जास्त आवडते. कारण कसोटीमधील यशासारखे दूसरे कोणतेही यश नाही. मात्र तुम्हाला क्रिकेटमधील सर्व प्रकारात खेळता आले पाहिजे.
खेळाडूंना ‘जोडीदारा’ची सोबत हवीच
By admin | Updated: September 13, 2014 13:03 IST