तिरुअनंतपुरम : भारतीय क्रीडा प्राधिकरणातील (साई) लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षांच्या वेगवान धावपटूने बुधवारी सकाळी स्वत:च्या डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. यामागील कारण अद्याप गुलदस्तात आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाने स्वत:ला संपविण्याच्या इराद्याने काचेच्या तुकड्याने डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याला त्वरित तिरुअनंतपुरमच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारांनंतर त्याला पुन्हा साई वसतिगृहात पाठविण्यात आले आहे. त्याच्या डाव्या हाताच्या नसेच्या वर काचेमुळे जखम होऊन रक्तस्राव झाला. तो तणावाखाली वावरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, साईने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. किशोर पुढे म्हणाले, ‘‘घटनेमागील कारण शोधून काढण्यासाठी आम्ही तपास करीत आहोत. तपास पथकात साईचा एक अधिकारी आणि दोन सहायकांची नियुक्ती करण्यात आली. चार वर्षांपासून साई केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या या युवकाने आपल्या लेखी जबानीत मानसिक ताण हे कारण दिले. विविध स्पर्धांच्या ओझ्यामुळे हा मुलगा तणावाखाली होता. सर्व प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.’’ एका महिन्याआधी अलपुझा येथे साईच्या जलक्रीडा केंद्रात चार प्रशिक्षणार्थी मुलींनी विषारी फळ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. सिनियर्सकडून होणारा अपमान आणि मानसिक छळ यांमुळे मुलींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.’’ (वृत्तसंस्था)
साईच्या खेळाडूने केला नस कापण्याचा प्रयत्न
By admin | Updated: June 11, 2015 08:47 IST