ब्लोमफौंटेन : ‘ब्लेडरनर’ द. आफ्रिकेचा पॅरालिम्पिक धावपटू आॅस्टर पिस्टोरियस याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले आहे. याआधी कोर्टाने त्याला चुकून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. तो निर्णय आता रद्द झाला. अनवधानाने हत्या केल्याप्रकरणी पिस्टोरियसला ५ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. एक वर्षे कारागृहात राहिल्यानंतर आॅक्टोबरमध्ये तो पॅरोलवर बाहेर आला. पण या निर्णयामुळे त्याला पुन्हा कारागृहाची हवा खावी लागेल. २०१३ साली व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी रीवा स्टीनकॅम्प हिच्यावर गोळी झाडून पिस्टोरियसने तिला संपविले होते. कुणीतरी चोर घरात शिरला असल्याचा समज झाल्याने बेडरुमच्या टॉयलेटमधील बंद दरवाज्यावर त्याने गोळीबार केल्याची कबुली नंतर त्याने दिली होती. गुरुवारी निर्णय देताना न्या. एरिक लीच म्हणाले, ‘पिस्टोरियस हत्येप्रकरणी दोषी आहे. हत्येमागे त्याची अपराधी भावना होती. हे प्रकरण पुन्हा सुनावणी न्यायालयाकडे सोपविण्यात येत असून ते न्यायालय शिक्षा निश्चित करेल.’
प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पिस्टोरियस दोषी
By admin | Updated: December 4, 2015 01:26 IST