फुझाओ (चीन) : रिओ आॅलिम्पिकदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर सावरलेल्या फुलराणी सायना नेहवालचे पुनरागमन यशस्वी ठरले नाही. तिला चायना ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. त्याचवेळी रिओ आॅलिम्पिक रौप्य पदकविजेती पी. व्ही. सिंधूसह अजय जयराम व एच. एस. प्रणय यांनीही आपापल्या सामन्यात बाजी मारून विजयी सलामी दिली.जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायना गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांनी कोर्टवर उतरली होती. दरम्यान, यावेळी तिला ५९ मिनिटांपर्यंत दिलेली झुंज समाधान देणारी ठरली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात सायनाला थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुकविरुध्द १६-२१, २१-१९, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत सध्या सहाव्या स्थानी असलेल्या सायनाला पोर्नटिपविरुध्द दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. या सामन्याआधी सायनाची पोर्नटिपविरुद्धची ९-१ अशी होती. पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने झुंजार खेळ करताना दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. यावेळी सायना लयीमध्ये दिसत होती. मात्र, तिसऱ्या गेममध्ये वेगवान खेळ करुन सायनाच्या चुकांचा फायदा घेत पोर्नटिपने अनपेक्षित बाजी मारली.दुसरीकडे भारताची दुसरी स्टार खेळाडू सिंधूने चिनी तैपईच्या चिया सीन ली हिला २१-१२, २१-१६ असे नमवून दिमाखात विजयी सलामी दिली. केवळ ३४ मिनिटांमध्ये बाजी मारताना सिंधूने जबरदस्त आक्रमक खेळ केला. सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत चियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर अमेरिकेच्या बेईवान झांगचे आव्हान असेल. सिंधूने याआधीच्या दोन्ही सामन्यात झांगला नमवले आहे. (वृत्तसंस्था)
‘फुलराणी’ पहिल्याच फेरीत आउट
By admin | Updated: November 17, 2016 02:16 IST