नवी दिल्ली : यंदा पद्म पुरस्कार पटकाविण्यात महिला खेळाडूंनी बाजी मारली. टेनिस स्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना पद्मभूषण तर तिरंदाज दीपिकाकुमारी हिची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या तीनही महिला खेळाडूंनी गेल्या वर्षी शानदार प्रदर्शन केले आहे. सानिया जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने गेल्या वर्षी स्वित्झर्लंडची स्टारखेळाडू मार्टिना हिंगीससोबत दोन ग्रॅण्डस्लॅमसह एकूण ९ विजेतेपद पटकविली आहेत. उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर तिने दुहेरी मानांकनात अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, ‘फुलराणी’ सायना नेहवालने सुद्धा चांगले प्रदर्शन केलेले आहे. सायनाने गेल्यावर्षी आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व इंडिया ओपन सुपर सिरिज आणि सैयद मोदी ग्रांप्री गोल्डमध्ये किताब जिंकला होता. तिरंदाज दीपिका हिने विश्वचषक फायनलमध्ये रौप्य जिंकले होते. सायना म्हणाली, पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे.
सायना, सानिया यांना पद्मभूषण; तर दीपिकाकुमारीला पद्मश्री
By admin | Updated: January 26, 2016 02:43 IST