नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीचा विचार करता विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणा-या लढतीत पाकिस्तान संघ भारताला पराभूत करू शकतो, असे मत पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास यांनी व्यक्त केले. विश्वकप स्पर्धेत यापूर्वी पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत भारत व पाकिस्तान संघांदरम्यान १५ फेब्रुवारी रोजी लढत होणार आहे. झहीर अब्बास म्हणाले, ‘माझ्या मते आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या संघांव्यतिरिक्त भारत किंवा पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. भारत आणि पाकिस्तान संघांसाठी १५ फेब्रुवारी रोजी खेळली जाणारी लढत महत्त्वाची आहे. माझ्या मते या वेळी पाकिस्तान संघाकडे विजय मिळविण्याची चांगली संधी आहे. गतचॅम्पियन भारतावर दडपण राहणार आहे. (वृत्तसंस्था)
पाकला विजयाची संधी : झहीर अब्बास
By admin | Updated: February 10, 2015 02:00 IST