नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा चांगला अनुभव आहे; पण आकडेवारीचा विचार करता या दोन्ही फलंदाजांना येथे धावा फटकावण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.भारताने श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या १५ सदस्यांच्या संघात ८ फलंदाजांचा समावेश आहे. त्यापैकी चार फलंदाज शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा यांनी आतापर्यंत श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.कोहली व रोहित यांनी श्रीलंकेत अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही, पण या दोन्ही फलंदाजांना श्रीलंकेत वन-डे व टी-२० सामने खेळण्याचा चांगला अनुभव आहे. भारतीय फलंदाजांमध्ये केवळ मुरली विजय याला श्रीलंकेत कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे. २०१० मध्ये विजयने येथे दोन कसोटी सामने खेळले होते. त्या वेळी त्याने तीन डावांमध्ये ९९ धावा फटकावल्या होत्या. रोहितने गेल्या काही दिवसांपासून विशेषत: कसोटी सामन्यात धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या रोहितला श्रीलंकेत अपेक्षित यश मिळालेले नाही. रोहितने श्रीलंकेत खेळलेल्या २१ वन-डे सामन्यांत केवळ २८१ धावा फटकावल्या असून त्याची सरासरी १४.७८ आहे. वन-डे कारकिर्दीत ३९.२० च्या सरासरीने धावा फटकावणाऱ्या रोहितने यातील १८ सामने श्रीलंकेविरुद्ध खेळले असून त्याने १५.९३ च्या सरासरीने केवळ २५५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने श्रीलंकेत ७ टी-२० सामन्यांत केवळ ८६ धावा केल्या आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावित शानदार सुरुवात करणारा रोहित त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत आहे. रोहितने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांनंतर पुढच्या ९ कसोटी सामन्यांमध्ये केवळ २३.७५ च्या सराससरीने ३८० धावा फटकावल्या. त्यात दोन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी रोहितची पाठराखण केली होती. कोहलीचा विचार करता त्याने श्रीलंकेत केवळ वन-डे व टी-२० सामने खेळले आहेत. तो प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी खेळणार आहे. कोहलीने श्रीलंकेत आतापर्यंत १८ वन-डे खेळले आहेत. त्यापैकी केवळ तीन डावांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली. त्यातील दोन डावांमध्ये तो शतकी खेळी करण्यात यशस्वी ठरला, तर एकदा त्याने अर्धशतक झळकावले. कोहलीने २०१२ च्या मालिकेत हम्बनटोटामध्ये १०६ आणि आरपीएस कोलंबोमध्ये नाबाद १२८ धावांची खेळी केली होती, पण एकूण विचार करता श्रीलंकेत त्याची वन-डे क्रिकेटमधील कामगिरी विशेष चांगली नाही. विराटने श्रीलंकेत १८ वन-डे सामन्यांत ५६९ धावा फटकावल्या असून त्याची सरासरी ३५.५६ आहे. विदेशात कोहलीची यापेक्षा कमी सरासरी केवळ विंडीजमध्ये (३४.७०) आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पाच गोलंदाजांसह खेळणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केल्यामुळे आघाडीच्या सहा फलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत आमच्यावर काही अतिरिक्त दडपण नसल्याचे सलामीवीर फलंदाज मुरली विजयने स्पष्ट केले. मुरली विजयने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात १५० धावांची खेळी केली होती. सलामीवीर मुरली विजय संघातील आपले स्थान पक्के करण्यास उत्सुक आहे. कोहलीने पाच गोलंदाजांना संधी देण्याचे संकेत दिल्यामुळे आघाडीच्या फलंदाजांवर दडपण आले का, याबाबत बोलताना विजय म्हणाला, ‘‘ही अतिरिक्त जबाबदारी नाही. आमचे ते कामच आहे. आमच्यापैकी एक फलंदाज मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला तरी संघासाठी ते फायद्याचे ठरेल. आमच्यापुढे चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते. आखलेली रणनीती यशस्वी ठरणे आवश्यक आहे.’’ सलामीवीर शिखर धवननेही बांगलादेशविरुद्ध १७३ धावांची खेळी केली आणि लोकेश राहुलही सलामीवीर म्हणून अंतिम संघात स्थान मिळविण्यास प्रयत्नशील आहे.(वृत्तसंस्था)
छाप उमटवण्याची संधी
By admin | Updated: August 4, 2015 22:58 IST