नवी दिल्ली : ‘आॅल इंग्लंड स्पर्धेसाठी माझ्यावर कोणतेही दडपण नाही. या स्पर्धेकडे मी इतर सुपर सीरिज स्पर्धेसारखेच पाहते. या स्पर्धेच्या नावावरून लोकांना ही मोठी स्पर्धा असल्याचे कळू शकते,’ असे वक्तव्य भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू हिने केले.जागतिक बॅडमिंटनमधील सर्वांत प्रतिष्ठेचा असलेल्या आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेला कोणत्याही प्रकारचे विशेष महत्त्व देऊन अतिरिक्त दबाव ओढावून घेण्याची सिंधूची इच्छा नाही. त्यामुळेच, अन्य सुपर सीरिज स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेकडेही पाहत असल्याचे सिंधूने सांगितले. सिंधूने पुढे म्हटले की, ‘एक खेळाडू म्हणून या स्पर्धेत मी त्याच खेळाडूंविरुद्ध खेळणार आहे, ज्यांच्याविरुद्ध मी इतर सुपर सीरिज स्पर्धेत खेळते. त्यामुळेच या स्पर्धेचे माझ्यासाठी अतिरिक्त महत्त्व नाही.’ सहा लाख डॉलरच्या या स्पर्धेची चुरस बर्मिंगहॅम येथे ७ ते १२ मार्च दरम्यान रंगेल. स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास दिसून येईल की, सिंधूचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद आणि माजी दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण या दोन भारतीयांनाच ही स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. २०१५ साली फुलराणी सायना नेहवाल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. परंतु, आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनविरुद्ध तिला पराभूत व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था)>प्रत्यक्ष स्पर्धेत नक्कीच होईल फायदास्पर्धेसाठी माझी तयारी चांगल्याप्रकारे सुरु आहे. प्रत्येक सामना माझ्यासाठी एकसमान असून येथे मी मुलांविरुद्ध खेळण्याचा सराव करीत आहे. याचा मला प्रत्यक्ष स्पर्धेत नक्कीच फायदा होईल. विजेतेपद माझे लक्ष्य असून, यासाठी मी दिवस-रात्र मेहनत घेत आहे, असे तयारीबाबत सिंधूने सांगितले़
..ही माझ्यासाठी सामान्य सुपर सीरिज
By admin | Updated: February 26, 2017 23:54 IST